Pune News : पिझ्झा खाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘डोमिनोज’च्या आउटलेट्समधील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, मृत झुरळांचे अवशेष, अन्नपदार्थांच्या साठवणुकीतील त्रुटी आणि स्वच्छतेचा अभाव आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागातील डोमिनोजच्या सहा आउटलेट्सचे परवाने निलंबित केले आहेत.
एफडीएकडून गेल्या चार दिवसांत ५० हून अधिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. याशिवाय, पुण्यातील आणखी दोन खाद्य आस्थापनांवरही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नामांकित खाद्यसाखळ्यांमधील अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांच्या पालनाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
एफडीएने केलेल्या कारवाईत पुण्यातील वारजे, हिंगणे खुर्द, चाकण आणि केईएम रुग्णालयाजवळील डोमिनोज आउटलेट्सचा समावेश आहे. तसेच कोल्हापुरातील राजारामपुरी आणि संभाजीनगर येथील आउटलेट्सचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत. पुण्यातील शिवाजीनगर येथील ‘स्पेशल तुपातील साबुदाणा वडे’ आणि वाघोलीतील ‘मे. यासीन फूड सेंटर’ या दोन आस्थापनांवरही कारवाई करण्यात आली आहे.
१३ ऑक्टोबर रोजी वारजे येथील डोमिनोज आउटलेटची तपासणी करण्यात आली. यावेळी स्वयंपाकघर आणि अन्न साठवणूक क्षेत्रात जिवंत झुरळे तसेच मृत झुरळांचे अवशेष आढळले. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ हाताळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचे योग्य विलगीकरण करण्यात आले नव्हते. अन्नपदार्थ स्वीकारताना तापमानाच्या नोंदीही अपूर्ण होत्या.
याशिवाय, स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाचा अभाव, अन्नपदार्थांची अस्वच्छ पद्धतीने साठवणूक, ग्राहकांच्या भोजनकक्षातील स्वच्छतागृहातून येणारी दुर्गंधी आणि अन्नवितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे विहित ओळखपत्रे नसणे, अशा त्रुटी तपासणीत आढळल्या. या गंभीर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर वारजे येथील आउटलेटचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला.
केवळ स्थानिक हॉटेल्स किंवा खाद्यपदार्थ विक्रेत्यांपुरती मर्यादित न राहता, नामांकित खाद्यसाखळ्यांमधील स्वच्छता आणि अन्नसुरक्षेची तपासणीही एफडीएकडून करण्यात येत आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, खाद्यपदार्थ विक्रेते आणि ऑनलाइन अन्नवितरण करणाऱ्या आस्थापनांवर तपासणी मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे.
एफडीएच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही विभागानं दिला आहे. त्यामुळे खाद्यव्यवसायात ब्रँडचे नाव मोठे असले, तरी स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन अनिवार्य असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.