MLA Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

MLA Ravindra Dhangekar : 'मला तुरुंगात टाकण्याचा...'; आमदार धंगेकरांच्या आरोपाने खळबळ

Chaitanya Machale

Pune News : कसबा विधानसभा मतदारसंघाबरोबरच संपूर्ण पुणे शहरात आपली वाढत असलेली लोकप्रियता आणि नागरिकांच्या प्रश्नासाठी आपण करत असलेली कामं हे सत्ताधारी भाजपच्या डोळ्यात खूपत आहे. पुणेकर मला मोठ्या संख्येने पाठिंबा देत असल्याचे पाहून 'मला तुरुंगात टाकण्याचा डाव भाजपने आखल्याचा' आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. (MLA Ravindra Dhangekar On BJP)

देशासह राज्यात भाजपची एकहाती सत्ता असताना कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे विजयी झालेले आहेत. पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने त्यांना ही गोष्ट रुचत नाही, त्यामुळे मला कोणत्यातरी प्रकरणात अडकवून कसं बाजूला करता येईल, यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न असल्याचा आरोप आमदार धंगेकर यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्यावतीने आयोजिण्यात आलेल्या पाण्याच्या टाकी उद्घाटन कार्यक्रमात आमदार धंगेकर यांनी महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ भाजपकडून व्हायरल केला जात आहे. अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांनी धंगेकर यांच्याविरोधात कलम 353 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

यावर खुलासा करताना आमदार धंगेकर म्हणाले, शिवीगाळ केली तर त्याबाबत पोलिस नोटीस देऊ शकतात. परंतु 353 सारखी खोटी कलमे लावून सरकारी कामात अडथळा आणल्याचे सांगण्यात येत आहे. समाजात एक आमदार म्हणून आपण करीत असलेलं काम भाजप पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यात खुपत असल्याने बदनामी होण्यासाठी ते हे असे प्रकार करीत आहेत.

माझी वाढती लोकप्रियता आणि नागरिक मला पाठिंबा देत आहेत. हे कमी करण्यासाठी मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपकडून केला जात आहे. मात्र अशा गुन्ह्यांना आपण घाबरत नाही, समाजासाठी माझे काम मी सुरूच ठेवणार असल्याचे धंगेकर यांनी ठणकावून सांगितले.

माझ्याविरोधात महापालिकेत सोमवारी निषेध आंदोलन करण्यात आले. अभियंता संघांनी जे आंदोलन केले. ते बेकायदेशीर आहे. हे आंदोलन करताना महापालिका किंवा पालिकेच्या सुरक्षा विभागाची परवानगी घेतली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन केल्यावर ज्या ठिकाणी हे आंदोलन आणि निषेध सभा झाली त्या संबधित हिरवळीवर कोणतीही सभा घेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे या अभियंता सभामधील आयोजकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी धंगेकर यांनी केली.

गोखलेनगर येथील कार्यक्रमात पोलिस हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत होते. लोकप्रतिनिधी असतानाही मला कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यापासून अडविले जात होते. चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी बालाजी पांढरे यांनी मला विनाकारण अडविले. माझ्यासोबत असलेल्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांना अडवून मारहाण करण्यात आली.

माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींना कार्यक्रमाला जाण्यापासून अडवले, ते पाहता लोकशाहीदृष्ट्या हे घातक आहे. पत्रकारांनादेखील मारहाण होऊ लागल्याने माझ्यातील कार्यकर्ता जागा झाला आणि मी काही शब्द चुकीचे बोललो, असे आमदार धंगेकर यांनी स्पष्ट केले. माझे कोणाशी व्यक्तिगत वैर नाही. नागरिकांचे प्रश्न सुटावे, यासाठीच आपण सतत प्रयत्नशील असल्याचे आमदार धंगेकर यांनी स्पष्ट केले.

(Edited By-Ganesh Thombare)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT