Pune Crime1 Sarkarnama
पुणे

Pune Crime News: पुणे पुन्हा हादरलं! कोरेगाव पार्कमध्ये धावत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार

Koregaon Park News Woman Assaulted in Moving Car: पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात मध्यरात्री धावत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Mangesh Mahale

Pune News: आयटी हब, शिक्षणाचं माहेरघर आणि ‘सेफ सिटी’ अशी ओळख असलेल्या पुण्यात मध्यरात्री एका धावत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. गजबजलेल्या आणि हायप्रोफाइल मानल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क(Koregaon Park) परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पीडित महिला आणि आरोपी यांची ओळख एका पार्टीदरम्यान झाली होती. पार्टी संपल्यानंतर आरोपीने “घरी सोडतो” असा विश्वास देत महिलेला कारमध्ये बसवले. मात्र, त्यानंतर मुंढवा-कोरेगाव पार्क मार्गावर धावत्या कारमध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. रात्री दीड वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

घटनेनंतर पीडित महिलेने धाडस दाखवत पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पुणे पोलिस (Pune Police) यांच्या अंतर्गत येणाऱ्या कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. परिसरातील CCTV फुटेज, हॉटेलमधील नोंदी, मोबाइल लोकेशन आणि तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत.

पार्टी, ओळख आणि त्यानंतरचा थरार

तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आणि आरोपी एका प्रसिद्ध हॉटेलमधील पार्टीत सहभागी झाले होते. पार्टीदरम्यान दोघांमध्ये ओळख झाली. त्यानंतर आरोपीने मैत्रीपूर्ण वर्तन करत महिलेला घरी सोडण्याची तयारी दर्शवली. मात्र, विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने हा घृणास्पद प्रकार केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे शहरातील पब संस्कृती, रात्रीच्या पार्ट्या आणि त्यानंतरची सुरक्षा यावरही नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

पुणेकर संतप्त; सुरक्षा व्यवस्थेवर टीका

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना अजून ताजी असतानाच आता कोरेगाव पार्कमधील या प्रकरणामुळे संताप आणखी वाढला आहे.

विशेष म्हणजे, कोरेगाव पार्क हा परिसर रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे पब, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्ससाठी प्रसिद्ध आहे. अशा भागातच महिलेला सुरक्षित वाटत नसेल, तर सामान्य भागातील परिस्थिती काय असेल? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सोशल मीडियावरही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. “पुणे खरंच सुरक्षित आहे का?”, “महिलांनी रात्री बाहेर पडायचं तरी कसं?”, “गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला आहे का?” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत.

पोलिसांकडून तपास वेगात

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित हॉटेलमधील CCTV, रस्त्यांवरील कॅमेरे, टोल नाक्यांवरील नोंदी आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. आरोपीची ओळख पटल्याची प्राथमिक माहिती समोर येत असली तरी पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे पुणे पोलिसांवर दबाव वाढला असून, शहरातील रात्रीची सुरक्षा, गस्त आणि संवेदनशील भागांतील पोलिस बंदोबस्त वाढवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT