Pune Land Scam: महंमदवाडी परिसरातील सुमारे 300 कोटी रुपयांच्या बाजारमूल्याच्या जमिनीच्या विकास करारात मोठ्या प्रमाणात फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तब्बल 37 कोटी 49 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे शहरप्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे, सिद्धांत भानगिरे यांच्यासह एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.
फिर्यादी विश्वजित सुभाष झंबर (वय ५६, रा. कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, गोयल, पटेल आणि ठकवाणी डेव्हलपर्स या भागीदारी संस्थेचे भागीदार राजेंद्र सीताराम गोयल, जयेश पुरुषोत्तम पटेल, विपुल वल्लभ पटेल, तसेच पूनम रूफिंग प्रा. लि.चे संचालक वल्लभभाई पटेल, सत्येन पटेल, जिग्नेश पटेल यांच्यासह प्रमोद भानगिरे आणि सिद्धांत भानगिरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला.
फिर्यादीनुसार, २०११ ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. आरोपींनी मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून महंमदवाडीतील सुमारे २० एकर आणि ८.५८ एकर जमिनीच्या विकास करारासाठी एकूण २२ कोटी रुपये स्वीकारले. नंतर प्रकल्पासाठी आणखी १५ कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.
मात्र, जमिनीचे टायटल क्लिअर करण्यात आले नाही आणि एस्क्रो करारही पूर्ण झाला नाही. उलट विकास प्रक्रियेत अडथळे निर्माण केल्याचा दावा आहे. तपासात असे समोर आले की, सर्व्हे नंबर १८/१/१ मधील १२ गुंठे जमीन फिर्यादींच्या संमतीशिवाय प्रमोद भानगिरे आणि इतरांना विकण्यात आली. सुरुवातीला कोणताही मोबदला दिला गेला नाही, नंतर २८ डिसेंबर २०२५ रोजी ९६ लाख रुपये स्वीकारून व्यवहार कायदेशीर दाखवण्याचा प्रयत्न झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या व्यवहारात तृतीय पक्षाला स्वारस्य निर्माण करून फिर्यादींचा हक्क डावलण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे. दरम्यान, या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी 8 जणांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मात्र, गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने आरोपींची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे सांगत आर्थिक गुन्हे शाखेचे म्हणणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.