murlidhar mohol Kripashankar Singh jagdish mulik sarkarnama
पुणे

Lok Sabha Election 2024 : कोणावर होणार उमेदवारीची 'कृपा'? सिंह पुण्यात; इच्छुकांमध्ये धाकधूक

Chaitanya Machale

पुणे : 29 फेब्रुवारी 2024 | आगामी लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) दृष्टीने इच्छुक उमेदवारांची चाचपणी भाजपकडून करण्यात येत आहे. यासाठी भाजपने आज गुरूवारी ( 29 फेब्रुवारी ) 2019 मध्ये लढवलेल्या 23 लोकसभा मतदारसंघांमध्ये आपले निरीक्षक पाठवले आहेत. पुण्याचे निरीक्षक म्हणून जबाबदारी आमदार आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे आशिष शेलार येऊ शकणार नाहीत. त्यामुळे ही जबाबदारी आता भाजपचे वरिष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांच्याकडे दिली आहे. कृपाशंकर सिंह आज पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सायंकाळी सात वाजेपर्यंत ही नावे हायकमांडला पाठवणार आहेत.

लोकसभेसाठी ( Lok Sabha Election 2024 ) महायुतीचं जागावाटप अद्याप निश्चित झालेलं नाही. मात्र, गेल्यावेळी लढविलेल्या 23 जागा भाजप पुन्हा लढविणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्याव्यतिरिक्त आणखी पाच जागा भाजप लढू शकते, अशी देखील चर्चा सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे लोकसभेसाठी उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह निरीक्षक म्हणून पुण्यात दाखल होतील. सिंह यांच्याबरोबर आमदार मदन येरावार हे देखील उपस्थित राहतील. सिंह आज आजी माजी आमदार, खासदार, विधानसभा निवडणूक प्रमुख, प्रदेश पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, लोकसभा प्रभारी, लोकसभा संयोजक, निवडणूक प्रमुख, प्रदेश मोर्चा अध्यक्ष, प्रदेश प्रकोष्ठ संयोजक, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा मोर्चा अध्यक्ष, मंडल अध्यक्ष आणि लोकसभा कोअर कमिटी सदस्य अशा तब्बल 70 हुन अधिक जणांशी निरीक्षक चर्चा करतील.

या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यावर सर्वाधिक पसंती असलेल्या इच्छुकाचे सर्वप्रथम नाव आणि त्यानंतर पसंती क्रमानुसार बाकीच्यांची नावे प्रदेश भाजपला पाठवण्यात येणार आहेत. हा अहवाल सायंकाळी सात वाजेपर्यंत पाठवणे निरीक्षकांना बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, इच्छुकांना कोणत्याही प्रकारचं शक्ती प्रदर्शन करण्यास भाजपच्या वरिष्ठांकडून मनाई करण्यात आलेली आहे. त्याबाबतची तंबीच भाजप नेतृत्वाकडून देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मोहोळ यांच्या बाजूने खिंड कोण लढविणार?

पुणे लोकसभेसाठी इच्छुक असलेले माजी महापौर मुरलीधर मोहोळ ( murlidhar Mohol ) यांच्यावर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे ते सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. पुण्यात सिंह आल्यानंतर मोहोळ यांच्या बाजूनं खिंड कोण लढविणार याबाबत चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे, माजी आमदार जगदीश मुळीक हे देखील निरीक्षकांच्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहे. जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी जगदीश मुळीकांकडून प्रयत्न केले जात आहेत.

( Edit By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT