sunil deodhar jagdish mulik murlidhar mohol sarkarnama
पुणे

Pune Lok Sabha Election 2024 : चार वेळा सर्व्हे करूनही भाजपचा उमेदवार ठरेना, आता 'या' निकषावर मदार

Pune Bjp News : महायुतीकडून पुणे लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

Sudesh Mitkar

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election 2024 ) सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील पक्षांनी मतदारसंघ आपल्याच वाट्याला येणार हे निश्चित मानून संभाव्य उमेदवाराबाबत चाचपणी सुरू आहे. यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे, पण अजूनही पुणे लोकसभेसाठी महायुतीला उमेदवार मिळेना झाला आहे.

महायुतीकडून पुणे लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्यादृष्टीनं वरिष्ठ पातळीवर उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. यासाठी आत्तापर्यंत तीन ते चार सर्व्हे करण्यात आले आहेत. पण, उमेदवार अद्याप निश्चित झाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व्हे करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण लोकप्रियतेच्या निकषावरती करण्यात येत असून, त्याआधारे लोकसभेचा उमेदवार ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एखाद्या इच्छुकाला उमेदवारी देण्यापूर्वी भाजपकडून काही निकष पाहिले जातात. त्यात उमेदवाराचा पक्षांतर्गत संपर्क, उमेदवाराची ज्येष्ठता, पक्षासाठी केलेलं काम, आर्थिक आणि सामाजिक बळ या गोष्टींचा विचार केला जातो, पण कसब्यात विधानसभेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काही निकषांना बगल देण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्याचा फटका पोटनिवडणुकीत भाजपला सहन करावा लागला. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला असून, ज्येष्ठ नेते विशेष काळजी घेताना दिसत आहेत.

यापूर्वी भाजपकडून केंद्रीय आणि राज्यस्तरावरती तीन ते चार वेळा सर्वेक्षण करण्यात आले. स्थानिक पातळीवरील नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडूनदेखील मतदारसंघाविषयी माहिती गोळा करण्यात आली आहे. यासह इच्छुक उमेदवारांची नावेही मागवण्यात आली आहेत. तरीही पक्षांच्या वरिष्ठांकडून कोणत्याही नावावरती शिक्कामोर्तब झालेला नाही.

त्यामुळे इच्छुकांमध्ये कोण किती लोकप्रिय आहे? कोणाच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे? कोण सर्व मतदारसंघामध्ये सर्वश्रुत असून, मतदारांपर्यंत पोहोचला आहे? कोणाला सर्व स्तरातून मतदान होऊ शकतं? या सर्व निकषांवरती सध्याचा सर्व्हे सुरू आहे.

दरम्यान, सर्व्हेबाबत इच्छुकांना कुणकुण लागली होती. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात 'इव्हेंट वॉर' रंगलं होतं. जास्तीत जास्त गर्दी जमावून लोकांपर्यंत पोहाेचत आपली लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. सध्या भाजपमधून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, भाजप नेते सुनील देवधर यांची नावं लोकसभा उमेदवारीबाबतीत समोर येत आहेत. आता सर्व्हेनंतर कोण आघाडीवरती राहणार? कोणाच्या नावावर पक्षश्रेष्ठी शिक्कामोर्तब करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


( Edited By : Akshay Sabale )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT