PMC Mayor Residence Renovation Sarkarnama
पुणे

PMC News: पुणे महापालिकेचा अजब कारभार! 12 वर्षांत एकाही महापौराचं वास्तव्य नाही, तरीही बंगल्यावर 46 लाखांचा खर्च

PMC Mayor Residence Renovation:पुणे महापालिकेने महापौर निवासाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी ४५ लाख मंजूर केले. या निर्णयावर वाद निर्माण झाला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : शिवाजीनगर येथील महापौर निवासस्थानाच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाने तब्बल ४५ लाख ९१ हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. मात्र ही प्रक्रिया नियमित निविदा न काढता फक्त कोटेशन पद्धतीने राबवल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

तातडीच्या तरतुदीचा वापर करत हे काम दिले गेले असून, या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीने हा प्रस्ताव मुख्य सभेसमोर ठेवला आहे.

महापौरांच्या निवासासाठी बंगला तयार करण्यात आला असला तरी गेल्या बारा वर्षांत कोणत्याही महापौराने येथे वास्तव्य केले नाही. त्यामुळे एवढा मोठा खर्च करून विद्यमान महापौर खरोखर येथे राहणार तरी का, असा संभ्रम व्यक्त केला जात आहे.

महापौरांची निवड झाल्यानंतर लगेचच या बंगल्याच्या दुरुस्तीची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली. नगरसचिव, मुख्य अभियंता आणि भवन रचना विभागातील अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करून कामांची यादी निश्चित केली. यामध्ये आतील-बाहेरील रंगकाम, लाकडी साहित्यावर पॉलिश, छताची दुरुस्ती, फर्निचर नूतनीकरण आणि स्वच्छतागृहांची दुरुस्ती यांचा समावेश आहे.

एक ठेकेदाराने ३८.७० लाख रुपयांच्या कोटेशनमध्ये सर्वांत कमी दर दिले असल्याने त्यांची निवड करण्याची शिफारस करण्यात आली आहे. जीएसटी आणि इतर खर्च मिळून एकूण रक्कम ४५.९१ लाखांपर्यंत पोहोचणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून महापौर बंगल्यात कोणीही राहत नाही. फक्त बैठका आणि कार्यकर्त्यांच्या भेटींसाठीच त्याचा वापर होतो. “महापौर राहायला जाणार नसतील तर पुन्हा इतका मोठा खर्च करण्याचे औचित्य काय?” असा सवाल सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT