pmc  Sarakrnama
पुणे

PMC News : पुणे महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लॅन: शहर स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी आता ठेकेदारांवर, हलगर्जीपणा केल्यास थेट टाटा 'बाय-बाय'!

PMC News : शहरातील झाडणकामातील अनियमितता आणि ठेकेदारांवरील सैल झालेली पकड लक्षात घेता, महापालिकेने रस्ते झाडणकामाच्या संपूर्ण व्यवस्थेलाच 'बदलीचा डोस' दिला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे शहरातील अस्वच्छता आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांमध्ये असलेली नाराजीची अखेर पुणे महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. शहरातील झाडणकामातील अनियमितता आणि ठेकेदारांवरील सैल झालेली पकड लक्षात घेता, महापालिकेने रस्ते झाडणकामाच्या संपूर्ण व्यवस्थेलाच 'बदलीचा डोस' दिला आहे.

प्रायोगिक तत्त्वावर पुढील तीन महिन्यांसाठी एक विशेष झाडणकाम प्रकल्प राबविण्यात येणार असून, यामध्ये तब्बल 4,709 अतिरिक्त कंत्राटी कामगारांची फौज मैदानात उतरवली जाणार आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत पालिकेच्या अधिकाऱ्यांवर खापर फोडणाऱ्या ठेकेदारांना चाप लावण्यासाठी प्रथमच दंडात्मक कारवाई आणि थेट कंत्राट रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

सहा वेळेस चूक केली, तर ठेका थेट रद्द!

या नव्या नियमावलीनुसार, पहिल्या महिन्यात ठेकेदारांना दंडांमधून सूट देऊन सुधारण्याची संधी दिली जाईल. मात्र, त्यानंतरच्या दोन महिन्यांत जर परिसरात अस्वच्छता आढळली, तर ठेकेदारांची गय केली जाणार नाही. टप्प्याटप्प्याने होणारी दंडात्मक कारवाई करण्यात येईल त्यानुसार पहिल्यांदा १,००० दुसऱ्यांदा २,०००, तिसऱ्यांदा ३,००० चौथ्यांदा ₹ १०,००० ,पाचव्यांदा ५०,००० तर सहाव्यांदा ठेका थेट रद्द करण्यात येणार आहे.

मनुष्यबळ थेट दुप्पट; पालिकेच्या तिजोरीवर १३.७८ कोटींचा भार

पुणे महापालिका हद्दीतील १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत तब्बल ५७४ चौरस किलोमीटरचा परिसर येतो. घनकचरा व्यवस्थापन विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, शहरातील झाडणकामासाठी पात्र रस्त्यांची एकूण लांबी ६,५०८ किलोमीटर इतकी आहे. प्रत्येक ७०० मीटरचा एक 'बीट' यानुसार शहरात एकूण ९,२९८ बीट तयार होतात.

सध्या शहरात ४,८१४ कामगार कार्यरत आहेत, ज्यात आता नवीन ४,७०९ कामगारांची भर पडणार आहे. म्हणजेच शहराच्या स्वच्छतेसाठी आता जवळपास दुप्पट मनुष्यबळ उपलब्ध असेल. या अतिरिक्त कामगारांसाठी महापालिका ठेकेदारांना दरमहा सुमारे १३.७८ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करणार आहे.

तक्रारी सोडवण्यासाठी टाईमलाईन निश्चित

नागरिकांनी व्हॉट्सॲप, हेल्पलाइन, ई-मेल किंवा मोबाईल ॲपद्वारे केलेल्या तक्रारींवर आता ठेकेदारांना पळ काढता येणार नाही. तक्रारींचे निवारण करण्यासाठी पालिकेने कडक कालमर्यादा ठरवून दिली आहे. सामान्य तक्रारी 12 तासांच्या आत निकाली काढणे बंधनकारक. तर तातडीच्या तक्रारी 6 तासांच्या आत निवारण करावे लागणार आणि अतितातडीच्या तक्रारी अवघ्या २ तासांत कामाचा निपटारा करावा लागणार आहे.

यापूर्वी शहरात कचरा दिसल्यास संबंधित भागातील आरोग्य निरीक्षक किंवा वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांना जबाबदार धरले जात होते. मात्र आता स्वच्छतेची थेट आणि संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदारावर असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT