Pune Police Sarkarnama
पुणे

Pune Police In Action Mode : पुणे पोलीस आयुक्तालय झाले खडबडून जागे; महिलांच्या सुरक्षेसाठी केल्या 'या' उपाययोजना

सरकारनामा ब्यूरो

Pune : पुणे शहरातील गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. एकेकाळी विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात आता खाकीवर्दीचा धाक उरलाय की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे महिलांवरील अत्याचार, खून,अपहरण, प्राणघातक हल्ले, चोरी, कोयता गॅंगची वाढती दहशत यामुळे पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे.

याचवेळी मंगळवारी(दि.२७)भरदिवसा सदाशिव पेठेत एका तरुणीवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर तर पुणे पोलिसांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पुणे पोलीस आयुक्तालय खडबडून जागे झाले असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी आक्रमक पावले उचलत नवीन उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार(Ritesh Kumar) यांनी सदाशिव पेठेतील घटनेनंतर अॅक्शन मोडवर आले आहेत. शहरातील संबंधित पोलीस(Police) ठाण्यांतील अधिकाऱ्यांकडून शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. पोलीस चौक्या २४ बाय ७ दिवस सुरू राहणार असून, सीसीटीव्हीने जोडल्या जातील. दामिनी पथकाची संख्या १५ वरून ४० पर्यंत वाढविण्यात येणार आहे.

तसेच, बीट मार्शलची संख्याही शंभरवरून दोनशे करण्यात येणार आहे. शाळा-महाविद्यालय सुरू होताना आणि सुटताना परिसरात बीट मार्शल आणि दामिनी पथकांनी गस्त घालावी असे आदेश देण्यात आल्याची माहिती रितेश कुमार यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

आता शहरातील शाळा - महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘पोलीस काका’,‘पोलीस दीदी’ आणि ‘बडीकॉप’ योजना कार्यक्षमपणे राबविण्यात येईल. याबाबतचे आदेश सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली आहे.

गुंड टोळ्यांवर कठोर कारवाई

दत्तवाडी, वारजे, सहकारनगर आणि सिंहगड रस्ता परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत माजविणाऱ्या गुंड टोळ्यांतील ३२ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांचा घटनास्थळी पोचण्याचा ‘रिस्पॉन्स टाइम’ हा सात मिनिटांवर आणला जाईल असे आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.

पोलीसकाका, पोलीसदीदी यांची कर्तव्ये-

- शाळा -महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संकट काळात मदतीसाठी धावून जाणार

- मुलींची छेडछाड, दादागिरी, रॅगिंगचा त्रास होत असल्यास मदत

- कोणी लग्नाचे, नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक होत असल्यास त्यावर लक्ष ठेवणे

- लैंगिक शोषण, गुड टच-बॅड टच रोखण्याबाबत प्रबोधन

- मुलींची, महिलांची वसतिगृहे, आश्रमशाळा, सुधारगृहांना भेटी देवून तक्रारींचा निपटारा

- शाळा-महाविद्यालयात तक्रार पेटी बसवून दर सोमवारी नोडल अधिकाऱ्यासमोर तक्रारींबाबत कार्यवाही

बडीकॉप योजना-

- परिमंडळ पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त आणि महिला पोलिसांचा सहभाग

- नोकरदार महिलांचे व्हॉटसअप ग्रुप तयार करणार, अडचण आल्यास व्हॉटसअप किंवा फोनद्वारे संपर्क.

- नोकरदार महिलांना २४ बाय ७ दिवस

मदत- नोकरदार महिलांच्या तक्रारी आणि मदत मागितल्यास त्वरित प्रतिसाद

- गृहिणी आणि महिला कामगारांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास तातडीने मदत

- नोकरदार महिलांसाठी कामांच्या ठिकाणी सुरक्षिततेचा दर्जा उंचावणे

- प्रत्येक पोलीस ठाण्यात ५ ते १५ कर्मचाऱ्यांची बडीकॉप म्हणून निवड

नियंत्रण कक्ष क्रमांक ११२

महिलांसाठी हेल्पलाइन १०९१

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT