Arvind Shinde Statement On Medha kulkarni Sarkarnama
पुणे

Pune Politics : 'चंद्रकांतदादांच्या बदनामीसाठी मेधा कुलकर्णींची मटका अड्ड्यावर धाड'; काँग्रेस शहराध्यक्षांनी उडवली खळबळ!

Arvind Shinde Statement On Medha kulkarni : कोथरुडमधील भाजपच्या गटबाजीवर शिंदेंनी ठेवले बोट!

Chetan Zadpe

Pune News : लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू होण्याचीही शक्यता आहे. अशा वेळी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. याच अनुषंगाने सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी कोथरुड मतदारसंघात भाजपमध्ये गटबाजी असून आजी-माजी आमदारांमध्ये सुप्त संघर्ष सुरु असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर कोथरुडचे आमदार व राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना बदनाम करण्यासाठी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी मटक्या अड्ड्यावर धाड टाकली होती, असा खळबळ उडवून देणारा आरोप केला आहे. यामुळे आता या मुद्द्यावरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसत आहेत. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'सात पक्ष-सात शहराध्यक्ष' या 'सरकारनामा'च्या विशेष कार्यक्रमात मुलाखत देत असताना काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी हा खळबळ उडवून देणारा आरोप केला आहे. कोथरुडमध्ये भाजप बलाढ्य स्थितीत आहे. परंतु या ठिकाणी भाजपमधील अंतर्गट गटबाजी लपून राहिलेले नाही, असे म्हणत त्यांनी कोथरुडचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये सुप्त राजकीय संघर्ष सुरु असल्याचे सांगत, भाजपमधील गटबाजीवर बोट ठेवले.

अरविंद शिंदे म्हणाले, "कोथरुड विधानसभा मतदारसंघात भाजपमधील गटबाजी लपून राहिलेली नाही. चार दिवसांपूर्वी माजी आमदार मेधा कुलकर्णी या कोथरुडमधील मटक्याच्या धंद्यावर धाड टाकत स्वत: घुसल्या होत्या आणि मटक्याचा धंदा बंद पाडला होता. कोथरुडमध्ये आणि राज्यात भाजपचीच सत्ता आहे, गृहमंत्री तुमचेच आहेत अन् तुमच्या बोलण्यावरुन पोलिस येत नाही. पोलिस आल्यावर सगळे निघून जातात, हा काय देखावा चालला आहे का? कुणाला बदनाम करण्यासाठी मेधा कुलकर्णी मटक्याच्या अड्ड्यावर गेले होत्या? कोथरुडचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटलांना बदनाम करण्यासाठीच कुलकर्णी मटक्याच्या अड्डयावर गेले होते. हे आता पुणेकरांना कळलं आहे."

शिंदे पुढे म्हणाले, "कोथरुडमध्ये अवैध धंदे चालतात, गुन्हेगारी वाढत आहे, कोथरुड अशांत आहे याची जबाबदारी कुणाची आहे? दहा वर्षांपासून तुमचे आमदार, तुमचे पालकमंत्री, तुमची सगळी सत्ता आणि तुम्ही उघडपणे जाऊन लोकांना सांगणार की मी मटक्याचे धंदे बंद केले? तुम्ही स्वत:लाच सर्टीफिकेट देत आहात की, हो आमच्या राज्यात मटक्याचे धंदे चालू आहेत. लोक याचा विचार करणार नाहीत का?" अशा शब्दात अरविंद शिंदे यांनी कुलकर्णी यांच्यावर टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT