Congress Leader Atul Londhe sarkarnama
पुणे

Pune Porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्याला विशेष वागणूक कोणाच्या आशीर्वादाने? पोलिसांची भूमिका संशयास्पद : अतुल लोंढे

Atul Londhe News: पुणे शहराचा सांस्कृतिक व शैक्षणिक नगरी असा लौकिक आहे पण त्याला काळिमा फासण्याचे काम या महायुती सरकारने केले आहे, असा आरोपही अतुल लोंढे यांनी केला आहे.

Umesh Bambare-Patil

Mumbai News : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे हाताळले आहे. दोघांना चिरडलेल्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची पोलिस स्टेशनमध्ये बडदास्त राखण्यात आली.

गुन्हा दाखल करताना किरकोळ कलमे लावून तातडीने रात्रीच कोर्टात हजर करुन जामीन मिळाला. ह्या प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसत असून अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, पुणे अपघातातील आरोपी हा बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांतच्या भरधाव कारने दोघांना चिरडले. वेदांत हा दारुच्या नशेत कार चालवत होता तसेच त्याची पोर्शे ह्या कारला नंबरप्लेटही नव्हती. बेदरकारपणे कार चालवून दोघांना चिरडलेल्या वेदांत अग्रवालला पोलीसांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यासाठी पिझ्झा, बर्गर मागवल्याचेही समजते.

एवढे गंभीर प्रकरण असताना पोलिसांनी तातडीने थातूर मातूर कलमे लावून लगेच कोर्टात हजर केले, पोलिसांनी वेदांतला वाचवण्यासासाठी एवढी तत्परता का दाखवली? पोलिसांवर कोणाचा राजकीय दबाव होता का? याची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत.

ज्या पोलिसांनी हे प्रकरण हाताळले त्या सर्वांना निलंबित करुन कठोर कारवाई केली पाहिजे. हीच तत्परता व विशेष वागणूक इतर नागरिकांना मिळते का ? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

पुणे अपघातप्रकरणी पोलिस कारवाईवर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जाग आली व चौकशी करण्याचे निर्देश दिले, हे म्हणजे ‘बैल गेला आणि झोपा केला’ असा प्रकार आहे. वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे, पण त्याचे कारनामे पाहता त्याच्या वयाकडे पाहण्याची गरज वाटत नाही. त्याने केलेला गुन्हा अत्यंत गंभीर आहे.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

दोन तरुणांचा जीव घेतलेला असताना पोलिसांना त्याचे काहीच कसे वाटले नाही? अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना धमक्या देण्यात आल्याचे पुणे पोलीस आयुक्त आता सांगत आहेत मग पोलिस काय झोपा काढत आहेत का?

महाभ्रष्टयुती सरकारच्या काळात राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. पुणे शहराचा सांस्कृतिक व शैक्षणिक नगरी असा लौकिक आहे पण त्याला काळिमा फासण्याचे काम या महायुती सरकारने केले आहे, असा आरोपही अतुल लोंढे यांनी केला आहे.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT