Pune News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी सुरुवातीला कोथरूडच्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. त्यानंतर जैन होस्टेलच्या जागेवरून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला. सातत्याने भाजप नेत्यांवर टीका केल्यामुळे धंगेकर हे राजकीय दृष्ट्या अडचणीत येऊ शकतात, असं बोललं जात असतानाच धंगेकर हे कायदेशीर प्रकरणामुळे गोत्यात येण्याची शक्यता आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या निकटवर्तीय असलेले व्यावसायिक समीर पाटील यांनी धंगेकर यांच्याविरुद्ध कोर्टात फौजदारी आणि दिवाणी दावा दाखल केला असून याबाबत कोर्टाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
गेले काही दिवस रवींद्र धंगेकर हे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना समीर पाटील यांच्यावरही गंभीर आरोप करत आहेत. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात बोलताना धंगेकर यांनी समीर पाटील यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाल्याचा आणि त्यांचा गुंडांशी साटेलोटे असल्याचा दावा केला होता. यासाठी त्यांनी पुरावे म्हणून काही फोटो आणि माहिती समोर आणली होती. मात्र, या आरोपांचा कोणताही ठोस संदर्भ किंवा पुरावा नसल्याचा दावा करत समीर पाटील यांनी धंगेकरांचे आरोप हे राजकीय स्वार्थापोटी केलेले असल्याचे म्हटले आहे. धंगेकर यांच्या या टीकेमुळे समीर पाटील यांच्या व्यवसायिक प्रतिमेला आणि वैयक्तिक आयुष्यात मोठा धक्का बसला असल्याचे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.
दरम्यान, १४ ऑक्टोबर रोजी समीर पाटील यांनी धंगेकर यांना अब्रुनुकसानीसाठी ५० कोटी रुपयांची नोटीस पाठवली होती. आता यानंतर पाटील यांनी पुणे जिल्हा न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला आणि दिवाणी खटलाही दाखल केला आहे. या दाव्याची सुनावणी २७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाली आहे.
या प्रकरणात न्यायालयाकडून रवींद्र धंगेकर यांना समन्स पाठवण्यात आले आहे. या समन्सनुसार त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतची पुढील सुनावणी ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.