

Sushma Andhare: फलटण येथील एका कुटुंबातील दोन जुळ्या बहिणींनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप करत काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यांपैकी एका मुलीला पत्रकार परिषदेत हजर केलं होतं. आज पुन्हा त्यांनी पत्रकार परिषद घेत या मुलींची सुसाईडल नोट वाचून दाखवली, या नोटमध्ये रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाचा उल्लेख असल्याचं त्यांनी दाखवून दिलं. यातील एका मुलीनं सुसाईडल नोट लिहिताना एक पत्र राज्य महिला आयोगालाही लिहिलं होतं. यानंतर मात्र महिला आयोगानं त्या मुलींना मदत करण्याऐवजी त्यांचं चारित्र्यहनन करण्याचं काम जाहीर पत्रकार परिषदेतून केलं असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, "महिला आयोग नावाच्या गोष्टीवर बोलायची मला आता इच्छा नाही. राजकीय पुनर्वसनासाठी जर काही माणसं या पदावर बसवली जात असतील आणि सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करणं हे त्यांच परम कर्तव्य असेल तर आम्हाला त्यावर फार बोलायची इच्छाच नाही. पण महिला आयोगाचं काम असतं महिला सक्षमीकरण, सबलीकरण, सहकार्य, समावेशन आणि समुपदेशन करणं. या आयोगाचं काम पत्रकार परिषद घेणं नाही. काल मी जे प्रश्न उपस्थित केले ते पोलीस स्टेशन आणि पोलिसांवर केले. बाजुला पोलीस अधिकारी बसले होते पत्रकार त्या पोलीस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत होते. पण या पोलीस अधिकाऱ्यांच्या आधीच महिला आयोग राघू सारखा पटापटा बोलायला लागला"
"मी महिला आयोगाला प्रश्नच विचारलेले नाहीत पण तरीही आयोगानं ज्या काही प्रश्नांची उत्तर दिली त्यात या मुलीच्या चारित्र्याबद्दल का बोललं गेलं? पहिली गोष्ट महिला आयोगानं मृत्यूनंतर संबंधीत मुलीचं चारित्र्यहनन केलं. मुळात जिथं तपास यंत्रणेवरच माझा आक्षेप आहे, तिथं पोलीस यंत्रणाच तपासाच्या घेऱ्यात आहे. ज्या पोलीस यंत्रणेवर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्या पोलीस यंत्रणेनं तयार केले पुरावे, त्या पोलीस यंत्रणेनं समोर आणलेला व्हॉट्सअप चॅट आम्ही किती खरा मानायाचा? असा सवालही यावेळी सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. या व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे महिला आयोगावर बसलेली एखादी व्यक्ती या मुलीचं असं झालं तसं झालं हे सांगणं काम आहे का? मुळात महिला आयोग काय पद्धतीनं काम करतो हे सांगितलं पाहिजे. जर महिला आयोगाला पत्रकार परिषदा घ्यायचा नाद आहे तर आयोगाला वर्षा आणि हर्षा आगवणे यांच्याबद्दल कळवळा का आला नाही? कारण महिला आयोगाला त्यांनी पत्र ८ नोव्हेंबर २०२२ रोजी लिहिलं होतं"
"फलटण शहर तसंच ग्रामीण पोलीस स्टेशनचे काही अधिकारी व कर्मचारी तसंच सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी किरण डुकरे यांनी सर्वांनी संगनमत करुन माझे आई-वडील जयश्री दिगंबर आगवणे आणि दिगंबर आगवणे यांच्यावर राजकीय द्वेषबुद्धीनं विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरुन वेगवेगळ्या खोट्या फौजदारी केसेस दाख केल्या. त्यांना त्रास देऊन भीतीचं वातावरण तयार केल्यामुळं नैराश्यातून आणि माणसिक ताणतणावामुळं आम्ही आत्महत्येला समोरं जात आहोत"
मग महिला आयोगानं वर्षा आणि हर्षा आगवणे यांच्याबाबत पत्रकार परिषद घेतली नाही? नाईक निंबाळकरांना तुम्ही तेव्हाच प्रश्न विचारले नाहीत? वैष्णवी हागवणे प्रकरणात तुम्ही वैष्णवीच्या बाजुनं प्रश्न का विचारले नाहीत? तनिषा भिसे प्रकरणात तुम्हाला रिपोर्ट सादर करायचा होता तो अद्याप सादर का केलेला नाही? असे अनेक सवाल यावेळी सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाला आणि आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना नाव न घेता विचारले आहेत.
"तुम्हाला आता भाजपमध्ये जायचं आहे म्हणून तुम्ही एखाद्या लेकराचं चारित्र्यहनन करता आणि भाजपचा एक माणूस वाचवता. कारण मुख्यमंत्र्यांनी त्याला क्लीनचीट देण्याचा प्रयत्न केला. म्हणून तुम्ही तातडीनं जाऊन मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन जर एखाद्या मुलीचं चारित्र्य हनन करत असाल तर तुम्ही खरंच महिला आयोग आहात का? महिला आयोग कुठल्या महिलेची बदनामी करत नसतो. त्यामुळं मला सुनील तटकरेंना विचारायचं आहे की, आवरा माणसं जरा चुकीच्या लोकांना चुकीच्य़ा ठिकाणी बसवून पक्ष धोक्यात आणू नका. महिला आयोगाच्या कारकिर्दीला कलंक लावू नका," अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.