मीनाक्षी गुरव -
Pune News : महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत परतल्यानंतर महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मीटिंगचा धडाका लावला आहे.तसेच काही दिवसांपूर्वीच त्यांनी मंत्रालयातील सर्व विभागाच्या पुढील 100 दिवसांच्या कामकाजाचा रोडमॅप मागितला आहे. त्यामध्ये शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीतही त्यांनी शिक्षण विभागानं गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पावले उचलावीत काही महत्वाचे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्यातील सर्वच शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता याबाबात आता शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे.
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (ता.17) माध्यमांशी संवाद साधला.ते शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पुणे (Pune) दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी सीबीएसई पॅटर्नबाबत महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (सीबीएसई) पालकांचा सर्वाधिक ओढा आहे.
म्हणूनच आता राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2025- 26 पासून राबविण्यात येणार आहे. इयत्ता पहिलीला शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये ‘सीबीएसई पॅटर्न’ सुरू करण्यात येणार आहे. तर, शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये दोन टप्प्यांत हा पॅटर्न राज्यात राबविला जाणार असल्याचं विधानही मंत्री भुसे यांनी शुक्रवारी दिली.
भुसे म्हणाले,विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलली जात आहेत. त्यात राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबविण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये इयत्ता पहिलीला ‘सीबीएसई पॅटर्न’लागू होईल. तर शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये अन्य इयत्तांचा ‘सीबीएसई’नुसार नवीन अभ्यासक्रम तयार करणे, त्यावर आधारित पाठ्यपुस्तके बालभारतीमार्फत छापणे अशी कार्यवाही होईल. दरम्यान, या वर्षभरात शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाईल.’’
यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षणविभागाच्या एका महत्त्वपूर्ण उपक्रमाविषयी माहिती दिली. ते म्हणाले,राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांना सुविधा मिळाव्यात, यासाठी शालेय शिक्षण मंत्र्यांपासून प्रत्येक शिक्षणाधिकारी एका शाळेची जबाबदारी स्वीकारणार आहे. यात, शाळेच्या छोट्या-मोठ्या अडचणी सोडविणे, शाळेच्या विकासास हातभार लावण्याची जबाबदारी घेतली जाईल. या धर्तीवर प्रत्येक तालुक्यातील एका शाळेवर माझ्यासह सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना विशेष लक्ष द्यावं लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याऐवजी तेथील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. परंतु, काही शाळांमध्ये पटसंख्या शून्य आहे, अशा ठिकाणी मात्र शाळांचा विचार करायला हवा, असंही मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.