
Mumbai News : लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारलेल्या महाविकास आघाडीच्या पदरात विधानसभेला मोठं अपयश आलं. या अपयशानंतर सावरणं तर राहिलं दूर आघाडीत एकमेकांना टार्गेट करणंच सुरू झालं आहे. काँग्रेस (Congress) आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जोरदार खटके उडताना दिसून येत आहे. याचदरम्यान,आता काँग्रेसच्या नेत्यानं केलेल्या विधानामुळे संजय राऊतांसह संपूर्ण शिवसेना भडकण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी शिवसेनेवर टीका करतानाच केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. शिवसेनेनं (Shivsena) मराठी माणसांचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्विकारलं ही त्या पक्षाची सर्वात मोठी चूक आहे,असं दलवाई यांनी सांगत राजकारण तापवलं आहे.
शिवसेनेनं मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्वीकारलं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मदत केली. त्यांच्या याच चुकीमुळे मुंबईचं गुजरातीकरण होत असल्याचा आरोपही दलवाई यांनी केला आहे. महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत काँग्रेसच्या नेत्यानं केलेलं हे विधान मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
एकीकडे बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडलं, हिंदुत्व सोडलं म्हणून उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनाही काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांच्या वक्तव्यामुळे संतापण्याची शक्यता आहे.त्यामुळे आधीच महाविकास आघाडीसह महाराष्ट्रात अडचणीत आलेल्या काँग्रेसची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते दलवाई म्हणाले,शिवसेनेनं आता पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा हाती घ्यावा. शिवसेना पक्षानं आधीच्या मराठी मुद्दा सोडल्यामुळेच महाराष्ट्रावर संकट ओढावलं आहे.मुंबई शहरात मराठी माणसावर अन्याय होत आहे, असं दलवाई यांनी म्हटलं आहे.
शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा मुद्दा कायम धगधगता ठेवला. काही कालांतरानं मराठीचा मुद्दा काही प्रमाणात बाजूला सारत हिंदुत्वाची कास धरली. याच मुद्द्यावर महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण जुळून आलं. शिवसेना-भाजपसोबत अशी युती केली.त्यानंतर राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तेत देखील आली. आणि त्या पक्षाचा मुख्यमंत्री बनला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं राजकारण बदललं.भाजपसोबतची युती तोडत उद्धव ठाकरे यांनी आपली शिवसेना सोबत घेत थेट ज्यांच्याविरोधात लढलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. ठाकरेंच्या रुपानं शिवसेनेचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनला.
त्यानंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदेंसह आमदार -खासदारांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेंनी मिळवलं. तर उद्धव ठाकरेंनी मशाल चिन्ह घेत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली.
आता हुसेन दलवाई यांनी मुंबई महापालिकेच्या आधी शिवसेनेला पुन्हा एकदा मराठी माणसांचा मुद्दा हाती घ्यावा असा सल्ला दिला आहे. तो ठाकरे किंवा शिंदे ऐकणार की दलवाईंनाच चार कडक शब्द सुनावणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.