Supriya Sule reply to Police Commissioner of Pune : पुणेकरांच्या सुरक्षेवरून सध्या लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्राद्वारे उत्तर देत, आकडेवारीचा दाखला देऊन गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा केला होता. तसंच हे पत्र त्यांनी पुण्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनाही पाठवून दिलं होतं. यावर आता सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांना प्रत्युत्तर दिलं असून हे पत्र तुम्ही मला पाठवण्याऐवजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवायला हवं होतं, अशा शब्दांत टोला लगावला आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी यावर आपली भूमिका मांडली.
त्याचबरोबर प्रत्युत्तरादाखल पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, "आपल्याला महाराष्ट्र पोलीस दलाविषयी अत्यंत आदर आणि अभिमान असल्याचे सांगितले आहे. पोलीस दल अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी तत्पर असते आणि त्यांनी नेहमीच महाराष्ट्राचा सन्मान वाढवला आहे, या शब्दांत त्यांनी पोलिसांचे कौतुकही केले. परंतू, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेशी थेट जोडलेले असल्याने आपल्याला जमिनीवरील वास्तव वेगळे आणि भीतीदायक दिसत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. पुणे शहरात फिरताना नागरिक सध्या कमालीच्या दहशतीखाली जगत असून, सातत्याने घडणाऱ्या क्रूर घटनांमुळे शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे"
आपल्या पत्रात सुप्रिया सुळे यांनी पुण्यात अलीकडच्या काळात घडलेल्या अत्यंत गंभीर आणि खळबळजनक गुन्ह्यांची संपूर्ण मालिकाच पोलीस आयुक्तांसमोर मांडली आहे. म्हाळुंगे येथे बालकावर अत्याचार करून झालेला खून, हडपसर परिसरातील बॉम्बसदृश वस्तू, नऱ्हे गावात भरदिवसा झालेले सपासप वार, दिवे घाटात टोळक्यांनी उगारलेले कोयते-तलवारी आणि रिक्षाचालकाला पुलावरून खाली फेकून देण्याची घटना, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. तसेच येवलेवाडी आणि हडपसरमधील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार, वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाची दिवसाढवळ्या झालेली हत्या, रस्त्यांवर दहशत माजवणारी टोळकी आणि शहरात खुलेआम विक्री होणारे ड्रग्जचे जाळे यांमुळे पुणेकरांची सुरक्षा धोक्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुण्यात विषारी दारूमुळे गेलेले २० जणांचे बळी हे या व्यवस्थेचेच प्रतीक असल्याचा टीका त्यांनी केला आहे.
पोलीस आयुक्तांच्या पत्रातील मुद्द्यांवर थेट बोट ठेवत सुप्रिया सुळे यांनी चार निरीक्षणेही नोंदवली आहेत. पोलीस आयुक्तांची आकडेवारी जर गुन्हे घटल्याचे सांगत असेल, तर मग नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण का आहे आणि पोलीस-नागरिकांमधील संवाद का कमी झाला आहे? असा सवालही त्यांनी केला आहे. दुसरीकडे, शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण असल्याचा दावा केला जात असतानाही प्रत्यक्षात जमावबंदीचे आदेश का लागू करावे लागतात? असा थेट प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसंच कलम ३७च्या लेखी आदेशाला तोंडी 'केवळ प्रतिबंधात्मक' म्हणणे संभ्रम निर्माण करणारे असल्याचे म्हटले आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शहराची बदनामी करण्यासाठी 'नरेटिव्ह सेट केले जात आहे' या पोलीस आयुक्तांच्या विधानाचा सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. जर शहराचे वाईट चिंतणारे कोणी असा खोटा नरेटिव्ह पसरवत असतील, तर त्यांच्यावर ठोस कायदेशीर कारवाई का होत नाही? आपल्याला कुणी अडवलंय का? असा आक्रमक सवाल त्यांनी विचारला आहे. केवळ तंत्रज्ञानाच्या आधारावर न राहता जमिनीवर प्रत्यक्ष पोलिसांची उपस्थिती वाढवणे आणि गुन्हा घडण्यापूर्वीच तो रोखणारे 'प्रतिबंधात्मक पोलीसिंग' करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सुनावले आहे.
पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आणि शांतताप्रिय शहर असल्याने, पुणेकरांचा सुरक्षिततेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी अधिक कठोर आणि दृश्यमान कारवाई करावी, अशी आग्रही मागणी करत सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिसांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. आता सुप्रिया सुळे यांच्या या थेट पत्रानंतर पुणे पोलीस प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.