Sharad Pawar  Sarkarnama
पुणे

Dada Vs Saheb : साहेबांच्या दोन दौऱ्यांची धास्ती, अजितदादांची अस्वस्थ राष्ट्रवादी...!

Vijaykumar Dudhale

Pimpri NEWS : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीन महिन्यांपूर्वी भूकंप झाला. अजित पवारांचा गट भाजपबरोबर गेल्याने राज्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्येही जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली. ‘साहेब की दादा, कोणता झेंडा घेऊ’ अशी अवस्था कार्यकर्त्यांची झाली. काही जण दादांसोबत गेले, तर काहींनी साहेबांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. आता पुतण्याला शह देण्यासाठी शरद पवार रिंगणात उतरले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डावललेल्या, दुखावलेल्या माजी आमदार, माजी महापौर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आदी नेत्यांची मोट बांधण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी साहेबच रिंगणात उतरले आहेत. (Sharad Pawar's tour, Ajit Dada's ncp's were scared...!)

पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दोनदा येऊन गेले आहेत. चऱ्होली येथे रविवारी वारकरी संमेलनास, तर दापोडीतील मानपत्र कार्यक्रमासाठी सोमवारी उपस्थित होते. या दोन्ही सोहळ्यांच्या निमित्ताने साहेबांनी आजी-माजी पदाधिकारी, पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

....त्यांना अनुलेखाने मारले!

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार यांची खास शैली आहे. ते एखाद्या व्यक्तीविषयी मोजक्या शब्दांमध्ये सूचक असे विधान करतात, तर कधी-कधी अनुलेखाने मारतात. वारकरी संमेलनाच्या व्यासपीठावर शरद पवार आणि माजी आमदार विलास लांडे एकत्र होते. वास्तविक लांडे यांच्या देव्हाऱ्यामध्ये शरद पवार यांचा फोटो आहे. पवारांना ते देव मानतात. मात्र, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर साहेब की दादा अशी भूमिका घेण्याची वेळ आली असताना त्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे लांडे यांच्याविषयी शरद पवारांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्या सोहळ्यात लांडे यांनी ‘साहेबांनी, पिंपरी-चिंचवड शहराचा विकास केला आहे,' अशी अनेक स्तुतिसुमने उधळून कौतुक केले. मात्र, एकाच व्यासपीठावर असूनही पवारांनी लांडे यांच्याकडे पाहिलेसुद्धा नाही, याची चर्चा कार्यक्रमांमध्ये होती.

मातब्बर-यंग ब्रिगेडमध्ये रंगणार सामना

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांची एकाधिकारशाही होती. त्यामुळे अनेक स्थानिक नेते नाराज झालेले आहेत. नेत्यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळलेल्यांची संख्याही अधिक आहे. विखुरलेल्या आणि नाराज नेत्यांना एकजूट करण्याचे काम शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सुरू केले आहे. भाजपमधील नाराज आणि राष्ट्रवादीतील अन्याय झालेल्यांची मोट बांधण्यास त्यांनी प्राधान्य दिले आहे. पवार यांनी ‘यंग ब्रिगेड’ला घेऊन जाण्याचे धोरण स्वीकारले आहे.

साहेबांनी साधला नाराजांशी संवाद

पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०१७ पर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व आणि दबदबा होता. एकेकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीचा आणि प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा गड म्हणूनही लौकिक होता. या गडावर अजित पवार यांचा एकहाती अमल होता. आता अजित पवारांचा गड उद्‌ध्वस्त करण्याचे धोरण राष्ट्रवादीच्या ‘साहेब गटा’ने अवलंबले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांनी मंडळांशी संवाद साधला.

‘पुन्हा कामाला लागा’

पिंपरी-चिंचवडमधील दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये शरद पवार यांनी भोसरी, पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अजितदादांनी दुखावलेल्या नेत्यांशी संवाद साधला. त्यात भोसरीतील माजी महापौर, माजी उपमहापौर, पिंपरीतील माजी महापौर ज्येष्ठ नेते, चिंचवडमधील माजी विरोधी पक्षनेते, माजी महापौर यांचा समावेश होता. त्यांना पुन्हा एकदा सक्रिय होण्याचा मंत्र पवारांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT