Pune News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षामध्येही फूट पडणार किंवा हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. मात्र, या सर्व चर्चांमध्ये काहीही तथ्य नसून, पक्ष अधिक बळकट करण्यासाठी शरद पवार गटाने आता एक नवा आणि मोठा प्लॅन आखला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पुण्यातील बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ही महत्त्वाची माहिती दिली.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व नेत्यांची एक महत्त्वाची बैठक शनिवारी शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. संघटनात्मक बांधणी आणि आगामी रणनीती ठरवण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
विलीनीकरणाचा कोणताही विचार नाही!
पक्षाच्या अस्तित्वाबाबत आणि काँग्रेसमधील (Congress) विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चांवर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, "आम्ही काँग्रेससोबत जाणार अशी कुठलीही चर्चा नाही. आमचा पक्ष सध्या खूप चांगलं काम करत आहे. त्यामुळे विलीनीकरण किंवा काँग्रेसमध्ये जाणे असा कुठलाही विचार आमच्या पक्षात नाही. मी अनेकदा सांगत आहे की आमचे लोक कुठेही जाणार नाहीत, आता त्यासाठी शपथा घेऊ का? 'उबाठा' पक्ष फुटल्यानंतर जाणीवपूर्वक अशा चर्चा घडवून आणल्या जात आहेत आणि विरोधी पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे."
15 ऑगस्टपासून महाराष्ट्र दौरा: सर्व आमदार-खासदार मैदानात
विरोधकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरण्यासाठी आणि पक्षाची ताकद दाखवून देण्यासाठी राष्ट्रवादी (शप) पक्षाने नवा कार्यक्रम आखला आहे. येत्या 15 ऑगस्टपासून पक्षाचे सर्व आमदार आणि खासदार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहेत. या दौऱ्यांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात जाऊन बैठका घेतल्या जातील आणि संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी काम केले जाईल. या संपूर्ण अभियानात आमदार आणि खासदारांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. तसेच, पक्षाच्या जिल्हा आणि राज्य कार्यकारणीमध्ये लवकरच मोठे बदल केले जाणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
अमोल कोल्हे यांच्या पक्षांतराच्या चर्चांवर स्पष्टीकरण
खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या वक्तव्यवर पडदा टाकताना शिंदे म्हणाले की, अमोल कोल्हे यांनी स्वतःच स्पष्ट केले आहे की, आम्ही सर्वजण आदरणीय शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालीच काम करणार आहोत. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या वावड्यांमध्ये काहीही तथ्य नाही.
राज्य सरकार टीका
यावेळी शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर आणि कंत्राट पद्धतीवर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला. राज्यात सध्या सुरू असलेली विकासकामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप त्यांनी केला. "सध्याच्या सरकारचे काम फक्त कंत्राटदार सांभाळण्याचे सुरू आहे. अधिवेशनात मोठी कामे मंजूर केली जातात, मात्र ती फक्त आपल्या मर्जीतील लोकांना कशी मिळतील, एवढेच पाहिले जात आहे," अशी टीका त्यानी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.