Ajit Pawar Shivajirao Adhalarao Patil Eknath Shinde sarkarnama
पुणे

Shirur Lok Sabha Election 2024 : "...तर मी अजित पवारांसाठी काम करणार," आढळरावांचं मोठं विधान

Sudesh Mitkar

गेल्या काही दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघावर ( Shirur Loksabha Election 2024 ) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दावा सांगण्यात येत आहे. अशात शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील ( Shivajirao Adhalarao Patil) यांची म्हाडा पुणे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आढळराव-पाटलांचा पत्ता कट झाल्याचं बोललं जात आहे. यावर आता आढळराव-पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. ( Shivajirao Adhalarao Patil Latest News )

आढळराव-पाटील यांनी आज ( 22 फेब्रुवारी ) म्हाडा पुणे अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यानंतर आढळराव-पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला ही संधी दिली आहे. पण, हे पद स्वीकारल्यानंतर माझा शिरूर मतदारसंघासाठीचा पत्ता कट झाला, असं वाटत असेल. पण तसं काही नाही."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. जेव्हा युतीची चर्चा होईल, तेव्हा दोन नंबरची मते कोणाला होती हे पाहिलं जाईल. हे पाहता शिवसेनेला ही जागा मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी मला काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत," असं आढळरावांनी म्हटलं.

"शिरूरच्या जागेबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला द्यायची झाली, तर मी त्या उमेदवाराचं काम करायला तयार आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी आदेश दिले तर महायुतीच्या उमेदवाराचे काम करू. पण, मलाही मुख्यमंत्री शिंदेंनी काम थांबवू नका, असे सांगितलं आहे," अशी माहिती आढळरावांनी दिली.

या वेळी आढळरावांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावरही हल्लाबोल केला. "अपयश झाकण्यासाठी अमोल कोल्हे बेंबीच्या देठापासून भाषण करत आहेत. पाच वर्षांत काही जमलं नाही. बैलगाडा शर्यतीसाठी मी काम केलं. त्यासाठी अनेकदा आंदोलन केली आहेत. मी मंजूर केलेल्या रस्त्यांचे श्रेय कोल्हे घेत आहेत."

"मी अमोल कोल्हेंसारखे पक्ष बदलेले नाहीत. मी शिवसेनेत होतो आणि अजूनही आहे. मला लोकसेभेचं तिकीट नाही मिळालं तरी चालेल. तिकिटासाठी मी कधीच फिरत नाही. मुख्यमंत्री शिंदे म्हणतील तसे काम करणार आहे. वेळप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा प्रचारदेखील करणार आहे," असं आढळरावांनी म्हटलं.

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT