Pimpri Chinchwad News : सत्तेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घातलं आहे. अशातच पुण्याचे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडून दादांकडे आले आहे.
यामुळे भाजपमध्ये काहीशी अस्वस्थता असतानाच दुसरीकडे पिंपरी- चिंचव़डमध्ये भाजपमधील अंतर्गत मतभेदांनी डोकं वर काढले आहे. चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांना डावलल्याचा आरोप करत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप समर्थक आणि भाजप पदाधिकारी यांच्यात खडाखडी झाली.
चिंचवड भाजपच्या आमदार अश्विनी जगताप(Ashwini Jagtap)यांनी मागील आठवड्यात प्रोटोकॉल पाळत नसल्याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर काळेवाडीतील झालेल्या युवा वॉरियर्स संवादापूर्वी भाजप संघटनेचे पदाधिकारी आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप समर्थक यांच्यात खडाखडी झाली. ‘टोपी’ वरून शाब्दिक बाचाबाची झाली. भाऊ समर्थकांनी असंसदीय भाषेचाही वापर करून वाभाडे काढले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याचे आयोजन केले होते. त्यानिमित्ताने पत्रकार परिषद सोमवारी झाली. त्यावेळी आमदार अश्विनी जगताप यांनी सरचिटणीस आणि माजी पक्षनेते नामदेव ढाके यांना प्रोटोकॉल पाळत नसल्याबाबत चांगलेच सुनावले. त्यावरून भाजपतील आमदार लक्ष्मण जगताप समर्थकांनी ढाके यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
दरम्यान, युवा वॉरियर्सशी संवाद हा कार्यक्रम काळेवाडीतील रागा पॅलेस येथे आयोजित केला होता. कार्यक्रमाची वेळ दुपारी तीनची होती. कार्यक्रम साडेपाचला सुरू झाला. तत्पूर्वी साडेचारच्या सुमारास कार्यक्रमस्थळी आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक एका ठिकाणी उभे होते. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेवक शशिकांत कदम, युवानेते संकेत चौंधे, महेश जगताप आणि काही माजी नगरसेवक गप्पा मारत होते.
त्यावेळी नामदेव ढाके जवळून जात असताना डोक्याकडे इशारा करीत ‘तेवढे तुमचे झाकून ठेवा’ असे म्हटल्यावर राजापुरे चिडले आणि शाब्दिक बाचाबाची झाली. त्यातून वहिनी आमदार अश्विनी जगताप यांना डावलले जात असल्याचा विषयही निघाला. राजापूर यांनी अक्षरशः ढाके यांचे वाभाडे काढले.
‘तुम्ही ज्युनियर आहात, मला सांगणारे तुम्ही कोण? तुम्ही भांडणे लावण्याचे काम करू नका. चिंचवडच्या जनतेने अश्विनी जगताप यांना निवडून दिले आहे. त्यांचा अपमान करणारे तुम्ही कोण? ’ राजापुरे आक्रमक झाल्याचे पाहतात ढाके नरमले.
त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मी गमतीने म्हणालो. माझा तसे म्हणण्याचा उद्देश नव्हता, मला तुमचा अपमान करायचा नव्हता, अशी सारवासारव केली. त्यानंतर प्रकरण निवळले.
दरम्यान, आमदार लक्ष्मण जगताप(Laxman Jagtap) समर्थकांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नामदेव ढाके यांची तक्रार केली आहे. आमदारांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. पक्षातून हकालपट्टीची मागणी केली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.