Supriya Sule Meet Dhangar Protesters Sarkarnama
पुणे

Dhangar Reservation : धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना फोन लावला; पण...

मिलिंद संगई

Baramati News : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये (एसटी प्रवर्ग) समावेश करावा, या मागणीसाठी धनगर चंद्रकांत वाघमोडे हे गेल्या पाच दिवसांपासून बारामतीत उपोषणाला बसले आहेत. त्या उपोषणकर्त्यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (ता. १३ नोव्हेंबर) भेट घेतली. धनगर समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच फोन लावला. मात्र, मुख्यमंत्री शिंदे हे बैठकीत असल्याने मुख्य सचिवांनी फोन उचलला. धनगर आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी दिल्ली आणि राज्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. (Supriya Sule Phone Call to Chief Minister Eknath Shinde on issue of Dhangar reservation)

एसटी प्रवर्गात धनगर समाजाचा समावेश व्हावा, या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने बारामतीत राज्यस्तरीय आंदोलन सुरू आहे. चंद्रकांत वाघमोडे आणि धनगर समाज बांधवांची खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संध्याकाळी उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. त्यावेळी एवढे वर्षे धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश का होऊ शकला नाही?, असा संतप्त सवाल धनगर समाजातील तरुणांनी खासदार सुळे यांना केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धनगर समाजातील तरुणांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. मात्र, मुख्यमंत्री हे बैठकीत असल्याने शिंदे यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी फोन उचलला. सुळेंनी त्यांच्याशी चर्चा करत धनगर आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्याची विनंती केली. ‘मुख्यमंत्री बैठकीत आहेत, मी त्यांना तुमचा निरोप देतो,’ असा निरोप गगराणी यांनी सुळे यांना दिला.

भूषण गगराणी यांच्यानंतर खासदार सुळे यांनी मुख्यंत्र्यांचे चिरंजीव डॉ. खासदार श्रीकांत शिंदे यांना फोन लावला. खासदार शिंदे यांच्या कानावर धनगर समाजाच्या तीव्र भावना घालण्यात आल्या. या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलण्याची विनंती करण्यात आली. चंद्रकांत वाघमोडे यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारच्या प्रतिनिधीने यावे, याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी पुन्हा बोलेन, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

मुंबईत मुख्यमंत्री आणि दिल्लीत केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्यासोबत धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची लवकर बैठक लावून देण्यात येईल, असेही सुळे यांनी स्पष्ट केले. शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी धनगर आरक्षणासंदर्भात उपयुक्त सूचना केल्याचे उपस्थित धनगर समाजातील एका नेत्याने सांगितले. त्यानंतर श्रीरंग बारणे यांना सुळे यांनी फोन लावला. मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलावे, असे आवाहन त्यांनी बारणे यांना केले.

चंद्रकांत वाघमोडे यांनी उपोषण दोन दिवस थांबवावे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास पुन्हा उपोषणासंदर्भात निर्णय घेता येऊ शकतो, अशी विनंती सुळे यांनी उपोषणकर्त्यांना केली. मात्र, गेल्या पाच दिवसांत सरकारकडून कोणीही भेटायला आलेले नाही. त्यामुळे यासंदर्भात सरकारच्या प्रतिनिधीने चर्चा करायला हवी, अशी भूमिका वाघमोडे यांनी घेतली.

सुप्रिया सुळेंना भाषणादरम्यान अडविले

खासदारकीचा राजीनामा देऊन सुप्रिया सुळे यांनी सरकारवर दबाव आणावा, अशी मागणी धनगर समाजातील एका तरुणाने केली. त्यावर माझ्या राजीनाम्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय मिटणार असेल तर मी राजीनामा देण्यास काहीही हरकत नाही, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवली. फक्त आरक्षणाच्या विषयावर बोला, इतर कुठल्याही विषयावर बोलू नये, असे सुळे यांना भाषणादरम्यान अडवून सांगितले.

गोविंद बागेसमोर होणारे आंदोलन १६ तारखेपर्यंत स्थगित

धनगर समाजातील तरुणांनी राज्यातील एकही नेत्याला गोविंद बागेमध्ये येऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली होती. त्या युवकांशी सुप्रिया सुळे यांनी चर्चा करत मार्ग काढला. गोविंद बागेसमोर उद्या होणारे आंदोलन हे १६ तारखेपर्यंत थांबवणार असल्याचे आंदोलनकर्ते अभिजित देवकाते यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT