Mumbai News: समृद्धी महामार्गानंतर महायुती सरकारमधील दुसर्या कोणत्या एखाद्या बिग प्रोजेक्टची चर्चा झाली असेल,तर ती मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकची. सुमारे सव्वा सात हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या मिसिंग लिंकला पहिल्याच पावसांत खड्डे पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर थेट 'एन्ट्री पॉईंट'चाच स्लॅब कोसळून पूर्णपणे राडारोडा हायवेवर येऊन पडला. या धक्कादायक प्रकारानंतर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी सोमवारी (6 जुलै) पहाटे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर या प्रोजेक्टच्या गुणवत्तेसह त्याच्या दीर्घकालीन सुरक्षित वापरावरच शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही मिसिंग लिंकवरील दुर्घटनेवरुन सरकारला धारेवर धरले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, 'जागतिक स्तरावर गौरवण्यात आलेला रस्ता, 1 मे 2026 ला उद्घाटन म्हणजे अवघे 66 दिवस झाले आहेत. 13.3 किमी रस्त्यासाठी 7,120 कोटींचा चुराडा करण्यात आला. अरे प्रतिदिन 100 कोटी रुपये प्रमाणे किमान 70 दिवस तरी काढायचे होते असा खोचक सवाल केला आहे.
याचदरम्यान, सुषमा अंधारे यांनी यावेळी पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने ही फक्त एक घटना नाही, तर निकृष्ट आणि भ्रष्ट कार्यपद्धतीचा ढळढळीत पुरावा असल्याचा जोरदार शाब्दिक हल्लाबोलही केला. तसेच कुठल्या विकासाच्या बाता मारताय?' अशी विचारणा करत सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमधून फडणवीस सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही पहिल्याच पावसात Infra Man चा Disaster Man झाला, असा जिव्हारी लागणारा वार केला आहे. दोन खड्ड्यांना "पहिल्या पावसाचं टेस्टिंग" म्हणणारे मुख्यमंत्री, आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या हजारो कोटींच्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पावर दरड कोसळून रस्ता बंद झाल्यालाही "मान्सून ट्रायल" म्हणणार का? असा खोचक टीकाही त्यांनी केली आहे.
सपकाळ आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, जगभर डोंगर फोडून बोगदे उभे राहतात, पण महाराष्ट्रात पहिल्याच पावसात प्रकल्प कोसळतात. कारण समस्या पावसाची नाही, तर निकृष्ट कामांची, भ्रष्टाचाराची आणि कंत्राटदारांना मिळणाऱ्या राजकीय अभयाची आहे. हजारो कोटींचे प्रकल्प... पण पहिल्याच पावसात विकासच 'मिसिंग'! असा चिमटाही काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला काढला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी या रस्त्याला 'मिसिंग लिंक' ऐवजी 'कनेक्टिंग लिंक' म्हणावे, असं म्हटलं होतं. तसेच हा प्रकल्प दोन शहरांतील दळणवळण सुलभ करणारा आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचा आर्थिक कणा आहे, असंही त्यांनी आपल्या भाषणात नमूद केलं होतं. .
मुख्यमंत्र्यांनी हा मिसिंग लिंकमध्ये वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचे कौतुक करत, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं वाहतुकीस अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक असल्याचं सांगितलं होतं. तसेच तो आधुनिक अभियांत्रिकीचा हा जागतिक नमुना केवळ एक मार्ग नसून, दोन महानगरांची आर्थिक स्पंदने जोडणारा दुवा असल्याने त्याला 'कनेक्टिंग लिंक' म्हटले पाहिजे असंही आपल्या भाषणात नमूद केलं होतं.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मिसिंग लिंक या 13.03 किमी लांबीच्या नव्या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे प्रवासातील वेळ तब्बल 25 ते 30 मिनिटांनी कमी होऊन प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार असल्याचे स्पष्ट केलं होतं. पण आता त्याच प्रोजेक्टच्या एन्ट्री गेटवर कोसळलेल्या दरडीमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरू झाल्या आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.