PSI Zende Sarkarnama
पुणे

PSI Somnath Zende Suspended : एका रात्रीत करोडपती झालेल्या 'पीएसआय'ला दणका; सोमनाथ झेंडेंवर मोठी कारवाई

PSI Somnath Zende - Dream 11: ड्रीम इलेव्हन या मोबाईल गेमिंग अॅपवर तब्बल दीड कोटी रुपये पीएसआय सोमनाथ झेंडे यांनी जिंकले होते.

उत्तम कुटे

Pimpri News : सध्या भारतात सुरू असलेल्या वन डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेवर 'ड्रीम ११' या मोबाईल गेमिंग अॅपवरील कायदेशीर जुगारात (खेळ?) पिंपरी-चिंचवडमधील पीएसआय सोमनाथ झेंडे यांनी तब्बल दीड कोटी रुपये फक्त ४९ रुपये लावून (बेट) नुकतेच जिंकले होते, पण करोडपती झाल्याचे त्यांचे हे स्वप्न काही दिवसांतच भंगले. कारण पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पीएसआय झेंडे यांच्यावर बुधवारी निलंबनाची कारवाई केली.

झेंडे हे मूळ जेजुरीचे असून, २०१६ च्या पीएसआय़ बॅचचे पोलिस अधिकारी आहेत. सध्या ते पिंपरी-चिंचवड पोलिस हेडक्वॉर्टरमधील दंगल नियंत्रण पथकात (आरसीबी) कार्यरत होते. गेल्या दोन वर्षांत झालेले हे त्याचे दुसरे निलंबन आहे. चाकण पोलिस ठाण्यात असताना त्यांनी आपल्या पंटरकरवी सत्तर हजार रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती.

निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर ते पुन्हा हजर झाले होते. शिक्षेची नियुक्ती म्हणून त्यांना साइड ब्रॅंच देण्यात आली, पण आता त्यांच्यावर 'ड्रीम ११' या मोबाईल गेमिंग अॅपवर दीड कोटींचे बक्षीस लागल्याच्या प्रकरणात वर्दीच्या वर्तवणुकीला बाधा पोहाेचल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

दरम्यान, 'ड्रीम इलेव्हन' या गेमिंग अॅपमुळे हजारो तरुण देशोधडीला लागल्याने त्यावर बंदीची मागणी होत आहे. दुसरीकडे नामवंत खेळाडूंकडून मात्र त्याची जोरदार जाहिरातबाजी सुरूच आहे. न्यायालयात तो कौशल्याचा खेळ असल्याचे सांगून पळवाट शोधण्यात यश आलेले आहे.

दरम्यान, झेंडेंना ज्या दिवशी ही 'लॉटरी' लागली, त्याच दिवशी पिंपरी-चिंचवड भाजपचे माजी संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी त्यांच्याविरुद्ध गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली.

ऑनलाइन जुगार वा गेम यापासून तरुण पिढीला वाचविण्यासाठी शासन व विविध घटकांकडून उपक्रम राबविले जात असताना झेंडे हे ऑनड्यूटी ऑनलाइन जुगार खेळतातच कसे, अशी विचारणा त्यांनी त्यात केली होती.

एवढेच नाही, तर त्यात मिळालेल्या रकमेचा गाजावाजा करून त्यांनी ऑनलाइन जुगाराला चालना देण्याचे काम केले असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या या तक्रारीची लगेच दखल घेण्यात आली होती.

त्यानंतर लगेच पिंपरी पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या डीसीपी स्वप्ना गोरे यांनी झेंडेंची चौकशी सुरू केली. त्यांच्या शिफारशीनुसार सीपींनी झेंडेंना बुधवारी निलंबित केले. आता पुढे झेंडेंची विभागीय चौकशी होणार असून, या चौकशीत त्यांना स्वतःचं म्हणणं मांडता येणार आहे.

Edited by : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT