ZP Teachers Transfer Relief News Sarkarnama
पुणे

Teacher's Work Load: शिक्षकांवर ‘ट्रिपल लोड’! ​आधी उन्हाळ्याच्या सुट्ट्या रद्द; आता तिसरी जबाबदारी खांद्यावर

Teacher's Work Load: राज्याच्या शिक्षण विभागात सध्या काय चाललंय? हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Sudesh Mitkar

Teacher's Work Load: राज्याच्या शिक्षण विभागात सध्या काय चाललंय? हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील शिक्षकांच्या हक्काच्या उन्हाळी सुट्ट्यांवर तर प्रशासनाने आधीच नांगर फिरवला, पण आता एकाच वेळी तीन-तीन सरकारी कामांचं ओझं त्यांच्या खांद्यावर लादलं आहे. यामुळं आता शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करायचं की केवळ सरकारी कारकून म्हणून राबायचं? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

​नेमकं प्रकरण काय?

आधीच उन्हाळ्याच्या सुट्ट्या रद्द होण्याची वेळ आलेली असताना राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर आता एक-दोन नव्हे, तर थेट तिहेरी जबाबदारी येऊन पडली आहे. नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण, जनगणनेची तयारी आणि मतदारयादी पडताळणी तिन्ही कामांचा ताण एकाच कालावधीत आल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता दुसरी ते चौथीसाठी नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षणाची रूपरेषा जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर ११ ते १४ मे आणि तालुकास्तरावर १८ ते ३० मेदरम्यान प्रशिक्षण होणार आहे. अभ्यासक्रम अंमलबजावणीसाठी हे प्रशिक्षण अत्यावश्यक मानले जात असले, तरी त्याच काळात इतर शासकीय जबाबदाऱ्या डोईजड ठरत आहेत.

दरम्यान, १६ मे ते १४ जूनदरम्यान जनगणनेचा पहिला टप्पा पार पडणार असून मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याआधी जनगणनेचे प्रशिक्षणही होणार आहे. याचवेळी मतदारयादी पडताळणी मोहिमेमुळे अनेक शिक्षक बीएलओ म्हणून काम करत आहेत. परिणामी, एकाच वेळी तीन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळायच्या कशा? असा प्रश्न शिक्षकांसमोर उभा राहिला आहे.

“जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, तर नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षणाचेही आदेश आहेत. दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन मार्ग काढला जाईल,” असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे प्रभारी संचालक नंदकुमार बेडसे यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्ष मैदानावर काम करणाऱ्या शिक्षकांना हा ‘मार्ग’ नेमका कसा असेल? याचीच चिंता अधिक आहे. एकीकडे मतदार पडताळणी न केल्यास कारवाईची भीती, तर दुसरीकडे प्रशिक्षण अनिवार्य, अशा कात्रीत शिक्षक सापडले आहेत. त्यामुळे एससीईआरटीचे प्रशिक्षण घ्यायचे की जनगणनेच्या कामावर हजर राहायचे, याचा निर्णय घेणेही शिक्षकांसाठी कठीण झाले आहे, अशी भूमिकाही बेडसे यांनी मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT