Nashik Police Transfer News : Sarkarnama
पुणे

Police Transfer : राज्यात एकाचवेळी 130 'पीआय'च्या बदल्या; 'आप'च्या मनात शंकेची पाल चुकचुकली

AAP Political News : 'निवडणूक जिंकण्यासाठी भाजप काही करू शकते...'

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad News : लोकसभा निवडणूक मार्च महिन्यात जाहीर होण्याची शक्यता असून त्याची तयारी राज्य पोलिस दलात सुरु झाली आहे. सध्या फक्त या खात्यातच राज्यभरात अधिकारी पातळीवर मोठ्या प्रमाणावर खांदेपालट सुरू झाला आहे. त्यात एकशे तीस 'पीआय'च्या सामूहिक बदल्या मंगळवारी (ता. 30) करण्यात आल्या. 13 जानेवारी रोजी एपीआय आणि पीएसआयच्या त्या झाल्या होत्या.

राज्य सरकारच्या गृहविभागाकडून करण्यात आलेल्या 130 बदल्यांपैकी वीस टक्के अधिकारी हे पिंपरी-चिंचवडमधीलच आहेत. तेथील 27 पीआयच्या बदल्या झाल्या असून त्यापैकी 23 जण पिंपरी-चिंचवड शहरात दाखल असणार आहेत. तर उद्योगनगरीतील बहुतांश बदली झालेले हे पोलिस अधिकारी नागपूरला गेले. हा निव्वळ योगायोग नसून त्यामागे वेगळेच कारण असल्याची शंका आम आदमी पार्टीच्या (AAP) मनात या बदल्यांवरून शंकेची पाल चुकचुकली आहे.

यावर पिंपरी-चिंचवड अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी बुधवारी (ता. 31) गंभीर आरोप केला आहे. आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्य़ासाठी भाजप (BJP) काहीही करू शकते, असे सांगत त्यासाठीच या बदल्या करण्यात आल्याचा दावा केला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट

'आप'च्या चेतन बेंद्रे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांवरून खळबळजनक विधान केले आहे. पोस्टमध्ये ते म्हणतात, नागपूर शहरातून पिंपरी चिंचवड शहरामध्ये येणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची संख्या बघा... भाजप काही करू शकते निवडणूक जिंकण्यासाठी. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील 27 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. तसेच राज्याच्या विविध भागांमधून 24 पोलिस निरीक्षक पिंपरी चिंचवड शहरात आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तडफदार आणि कार्यक्षम पीआयचा बदली झालेल्यांत समावेश असल्याने त्याचा विपरित परिणाम पिंपरी-चिंचवड पोलिस (Police) दलावर होणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात तसेच वेगाने गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यास या बदल्यांमुळे थोडा अडथळा येणार आहे. त्याला पोलिस दलातील सूत्रांनीही दुजोरा दिला. मंगळवारी करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपती पदक मिळालेल्या एका पीआयचाही समावेश आहे.

मे-जूनमधील या रुटीन बदल्या नसून त्या इलेक्शन ट्रान्स्फर आहेत. स्थानिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. त्यांची जिल्ह्याबाहेरच नाही, तर राज्यात दूरवर बदली करण्यात आल्याने त्यांच्यात नाराजीची भावना आहे.

राज्याचे स्पेशल आयजी (आस्थापना) के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी हा पीआयच्या बदल्यांचा आदेश मंगळवारी काढला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या बदल्या करण्यात आल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT