Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
पुणे

Uddhav Thackeray : ज्यांनी राजभवनात जायला पाहिजे ते शेतात जाऊन अमावस्येला पूजा-अर्चा करताहेत; ठाकरेंचा शिंदेंना टोला

Political News : मुख्यमंत्रीपद मिळाले नसल्याने एकनाथ शिंदे हे आता गृहमंत्रीपद आपल्याकडे राहावं यासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. याबाबत आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असताना देखील अद्याप सरकार अस्तित्वात आलेले नाही. महायुतीतील मित्र पक्षांमध्ये मंत्रिपदाच्या वाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जात आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांसाठी गावी गेल्याने उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्रीपद मिळाले नसल्याने एकनाथ शिंदे हे आता गृहमंत्रीपद आपल्याकडे राहावं यासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. याबाबत आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Uddhav Thackeray News)

विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचा आरोप करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हे उपोषणाला बसले आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बाबा आढाव यांचे भेट घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर आले होते. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बाबा आढाव यांनी उपोषण देखील सोडले. यादरम्यान बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'आजचा दिवस लक्षात राहणारा आहे. बाबा आढाव (Baba Adhav) प्रेरणा देणारे आणि प्रेरणा कधी म्हातारी होऊ शकत नाही. सध्या निवडणुकीमध्ये हरलेल्यांना आणि जिंकलेल्यांना देखील या निकालावर विश्वास नाही. त्यामुळे दोन्ही लोक बाबा आढाव यांचे भेट घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत.'

बाबा आढाव यांनी या आंदोलनाला सुरुवात केली आहे. ही जनआंदोलनाची ठिणगी असून वनवा पेटवायला एक ठिणगी पुरेशी असते. हे आंदोलन म्हणजे ठिणगी आहे. योजनांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विकत घेतला आहे. या घोळात एक मोठा विषय इव्हीएमचा आहे. आपण मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅटमध्ये त्या मतदानाची चिठ्ठी पाहायला मिळते मात्र ती व्हीव्हीपॅट मोजली जात नाहीत. त्यामुळे माझे मत कोठे जाते हे समजायला हवे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानादिवशी शेवटच्या एका तासात 76 लाख मते कशी वाढली हे पाहणे आवश्यक आहे. शेवटच्या तासात इतकी मतं वाढली असती तर प्रत्येक मतदान केंद्राबाहेर हजारो जणांची रांग असणे आवश्यक होते. मात्र, तसं कुठेही दिसलं नाही त्यामुळे हे सगळं संशयास्पद असल्याचं ठाकरे म्हणाले

राज्यात महायुतीला एवढं राक्षसी बहुमत असून देखील महाराष्ट्रात आनंद का नाही. बहुमत मिळून देखील राजभवनात जाण्याऐवजी हे लोक शेतात पूजा-अर्चा करण्यासाठी का जातायेत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी गेलेत, यावरुन यांची मानसिकता दिसुन येते‌‌, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

दरम्यान, महाराष्ट्र लेचा-पेचा नाही. महाराष्ट्र देशाला दिशा देईल. महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे आंदोलन पुढे नेतील. बाबा आढाव यांनी हे आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली. या विनंतीला मान देत बाबा आढाव यांनी उपोषण देखील सोडले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT