Pune News : मनसेचे फायर ब्रँड नेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या वसंत मोरे यांनी मनसेचा राजीनामा देण्याचा निर्णय आज घेतला आहे. या त्यांच्या निर्णयानंतर मोरेंना मानणाऱ्या लोकांमध्ये आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळाली. त्यामुळे वसंत मोरे यांच्या राजीनाम्याची बातमी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी वसंत मोरे यांच्या कात्रज येथील घराच्या बाहेर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. वसंत मोरे यांनी या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या.
या वेळी वसंत मोरे (Vasant More) यांच्या घराच्या बाहेर उपस्थित राहिलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी वसंत मोरे असतील त्यांच्यासोबत आम्ही असणार आहोत, असं बोलून दाखवलं. तसेच अनेकांनी वसंत मोरे यांच्या बरोबर आपण देखील मनसेला राम राम ठोकत असल्याचं सांगितलं. या वेळी मनसेमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये मोरे यांच्यासोबत अन्याय झाले असल्याची भावनादेखील या वेळी कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.
मनसेला वसंत मोरे नकोसा झाला होता...
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना वसंत मोरे म्हणाले, ज्यावेळी नीटसं कळत नव्हतं, त्या वेळेपासून वहीच्या पहिल्या पानावरती शिवसेना (Shivsena) आणि जय महाराष्ट्र लिहीत आलो. तेव्हापासून मी राजसाहेबांसोबत आहे. अनेक मनसैनिकांचे मला फोन आले की, तात्या तुम्ही मनसे सोडू नका.
परंतु जोपर्यंत पुणे शहरातील ही लोकं मनसेमध्ये आहेत, तोपर्यंत कोणत्याही मनसैनिकाला न्याय मिळू शकत नाही. गेली अनेक वर्षे मनसे (MNS) चे पुणे शहरांमध्ये जाळ निर्माण केलं. ते संपवण्याचे काम गेल्या दोन वर्षांत करण्यात आलं. मनसेमधीलच काही लोकांना मी नकोसा झाला होतो, त्यामुळे वसंत मोरेला मनसे हवीशी होती. मात्र, मनसेला वसंत मोरे नकोसा झाला होतो.
मनसेच्या एकाही नेत्याचा कॉल घेतला नाही...
शहरातील राजकारणाबाबतचं माझं हे गाऱ्हाणं मी राजसाहेबांपर्यंत पोहोचवलं होतं. तुम्ही कुठेतरी कमी पडला. शहरातील काही लोक माझ्या फेसबुक पोस्टचे स्क्रीनशॉट साहेबांपर्यंत पोचवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते. आज राजीनाम्याच्या निर्णयानंतर अनेक मनसैनिकांचे मला फोन आले. मी त्या प्रत्येक कॉलला उत्तर दिलं. मात्र, मनसेच्या कोणत्याही नेत्याचा कॉल मी स्वीकारला नसल्याचं वसंत मोरे यांनी या वेळी सांगितलं.
संन्यास घेईल, पण...
माझं भांडण हे कधीही राजसाहेब, मनसे सोबत नव्हतं आणि नसणारही. मात्र आज मी परतीचे सर्व दोर कापून टाकले असून, एक वेळ संन्यास घेईल, मात्र परत मनसेमध्ये जाणार नाही. असं मोरे यांनी स्पष्ट केलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
चार जणांना निवडणूक लढवायला लावावी...
वसंत मोरे म्हणाले, माझं राज ठाकरे (Raj Thackeray) यांना हात जोडून एक विनंती असेल की, ज्यांनी मनसेमधून पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी नाव दिली त्यांना आता लोकसभा निवडणूक लढवायला लावावी. अमित ठाकरे यांनी पुण्यातून निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली असती तर मी त्यांच्यासोबत उभा राहिलो असतो. मात्र, आता मी कोणत्याही परिस्थितीमध्ये मनसेचा लोकसभेचा उमेदवार नसणार आहे.
त्यामुळे मनसेकडून ज्या चार जणांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यांना ही निवडणूक लढवायला लावावी. त्यातील काही लोकांनी माझा लोकसभेचा पत्ता कट व्हावा, यासाठी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यांची इच्छा पूर्ण झाली असून माझा पत्ता कट झाला आहे, असे मोरे म्हणाले. तसेच पुढील दोन दिवसांत पुणेकरांचा कौल घेऊन पुढचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितलं.
(Edited by Amol Sutar)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.