Chhatrapati Sambhajinagar News : राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी किमान शिवसेनेच्या विद्यमान 13 खासदारांना तरी उमेदवारी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या वाऱ्या करत आहेत. अमित शाह यांच्यासोबत बैठका घेऊन जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी शक्ती पणाला लावत आहेत. भाजपने छत्रपती संभाजीनगरची जागा लढवण्याची घोषणा केल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी येऊन योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी उमेदवारीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
समर्थकांनी मुख्यमंत्र्यांना मेल करत संभाजीनगरतून संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी लावून धरली आहे. दरम्यान, महायुतीच्या जागावाटपाची अंतिम बोलणी सुरू असताना अचानक भुमरे समर्थकांना जाग आल्याने त्यांचे हे वराती मागून घोडे, असाच प्रकार असल्याचे दिसून येत आहे. सहा महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील शिवसेनेचे स्थानिक नेते मंत्री संभाजीनगर लोकसभेची जागा आमचीच असल्याचे छातीठोकपणे सांगत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मात्र, जसजशा लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या आणि जागावाटपाची प्रक्रिया वेगाने होऊ लगाली तशी शिवसेनेच्या नेत्यांची बोलती बंद झाली. गेल्या दोन महिन्यांत शिवसेनेचे जिल्ह्यातील मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांच्यासह कुणीच संभाजीनगरच्या जागेवर दावा सांगणारे विधान केले नव्हते. भाजप हा मतदारसंघ शिवसेनेकडून खेचून घेणार याची जाणीव झाल्यामुळे कदाचित शिवसेना बॅकफूटवर गेली होती.
त्यातच केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा झाली आणि त्यातून त्यांनी 'संभाजीनगर लोकसभा से मोदी जी के लिए कमल भेजोगे ना', असे विधान करत ही जागा भाजपच लढवणार यावर शिक्कामोर्तब केले. संभाजीनगरचा दौरा झाल्यानंतर अमित शाह यांनी महायुतीच्या राज्यातील नेत्यांची मुंबईतही बैठक घेतली. या वेळी शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अगदी थोड्या जागा देण्याची तयारी दर्शवत भाजपने राजकीय बॉम्ब टाकला.
आता केवळ दबाव तंत्र म्हणून इतके दिवस गप्प बसलेल्या अनेक मतदारसंघांतील शिवसेनेच्या नेत्यांनी जागेवर दावे सांगणे सुरू केले असल्याचे बोलले जाते. दिल्लीत जागावाटप अंतिम होत असताना शिवसेनेने सुरू केलेली ही धडपड म्हणजे अधिकाधिक जागा मिळवण्यासाठीचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. संभाजीनगर मतदारसंघातील संभाव्य उमेदवारीची तयारी पाहता शिवसेनेचा (Shiv Sena) एकही मंत्री, आमदार फिरताना दिसत नाही. या उलट भाजपने गेल्या वर्षाभरापासून या मतदारसंघात तयारी सुरू केली होती. त्यामुळे भुमरे यांच्या समर्थकांचा हा मेल प्रपंच कितपत उपयोगी ठरतो हे लवकरच स्पष्ट होईल.
(Edited By - Chetan Zadpe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.