Governor Appointed MLC Sarkarnama
पुणे

Governor Appointed MLC : राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी अजितदादांपुढे शक्तिप्रदर्शन; पवारांनी काय दिला शब्द?

कल्याण पाचांगणे

Malegaon, 08 September : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच इच्छुकांमधून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून चर्चेत असलेल्या रूपाली चाकणकर यांच्या नावाला रूपाली ठोंबरे यांनी विरोध दर्शविला होता.

तो वाद शांत होत नाही तोच आज बारामतीत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकते यांना संधी द्यावी, यासाठी समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच जोरदार शक्तिप्रदर्शन केले. उपमुख्यमंत्री पवार यांनी ‘देवकाते यांच्या नावाचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पक्षापुढे मांडतो', असे सांगून देवकाते समर्थकांची समजूत काढण्याच प्रयत्न केला.

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला सहा, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) प्रत्येकी तीन जागा मिळणार असल्याची माहिती आहे. या बारा जागांसाठी तीनही पक्षांत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार आनंद परांजपे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि मुंबई बॅंकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, रूपाली चाकणकर यांच्या नावाला रूपाली ठोंबरे पाटील यांनी विरोध दर्शवला होता, त्यानंतर पक्षीय प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेत्यांनी त्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज हे बारामतीच्या दौऱ्यावर होते. राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात बारामती तालुक्यातील धनगर बांधवांनी राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विश्वासराव देवकाते यांना संधी मिळावी, अशी मागणी करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. देवकाते समर्थकांनी या वेळी जोरदार घोषणाबाजीही केली.

‘तुमची मागणी पक्षाच्या वरिष्ठ कमिटीकडे मांडतो’

राज्यपाल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखाली राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी निश्चित होणार आहे. महायुतीमधील तीनही पक्ष जागेबाबतचा निर्णय एकमताने घेणार आहेत.

राज्यपाल नियुक्त आमदाराकीसाठी राज्यभरातून इच्छुकांची मोठी संख्या आहे. त्याच पद्धतीने देवकाते यांच्या नियुक्तीचीही मागणी होत आहे. तुमची मागणी पक्षाच्या वरिष्ठ कमिटीकडे मांडतो, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संंबंधितांना दिले.

‘अजितदादा संधी देतील’

राज्यात धनगर आरक्षणाबरोबरच समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विश्वास देवकाते यांच्यासारख्या नेत्याची विधान परिषदेत गरज आहे.

देवकाते यांनी बारामतीचे नगरसेवक, माळेगाव कारखान्याचे संचालक, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष अशा पदावंर काम केले आहे, त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला आणि धनगर समाजाला होणार आहे, त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विश्वास देवकाते यांना अजितदादा पवार संधी देतील, अशी आम्हाला आशा आहे, असे देवकाते समर्थकांनी म्हटले आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT