Dilip Walse Patil-Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Shirur Loksabha Constituency : अजितदादांचा ‘दुसरा हट्ट’ही वळसे पाटील पूर्ण करणार का?

NCP News : राष्ट्रवादीत आठ महिन्यांपूर्वी बंड करून भाजपला पाठिंबा देताना अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अतिशय निष्ठावान अशी ओळख असलेले दिलीप वळसे पाटील यांनाही आपल्याबरोबर येण्याचा हट्ट धरला होता.

Chaitanya Machale

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती आणि शिरूर मतदारसंघात उमेदवार उभा करण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. बारामतीमधून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी घेण्यास सुरुवातही केली आहे.

शिरूरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांचा पराभव करण्याचा चंग अजित पवार यांनी बांधला आहे. कोणत्याही परिस्थितीत आगामी निवडणुकीत खासदार डॉ. कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणारच! असे वक्तव्य अजितदादांनी जाहीर सभेत केले आहे. त्यासाठी त्यांनी आपली यंत्रणा या मतदारसंघात कामालाही लावली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजितदादांना पुन्हा उपमुख्यमंत्री केले आहे. तसेच, त्यांच्यासोबत आलेल्या ज्येष्ठ आठ सहकाऱ्यांना मंत्रिपदेही देण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्यानंतर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी लोकसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिरूरच्या जागेवर त्यांनी दावा केला असून, आगामी निवडणुकीत आमचाच उमेदवार विजयी होईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र, कोल्हे यांच्या तोलामोलाचा उमेदवार अजूनही अजितदादांना अद्यापही मिळाला नाही, हेही तितकेच सत्य आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, महायुतीच्या जागावाटपांमध्ये शिरूरची जागा अजित पवार यांच्या वाट्याला येणार असल्याने आढळराव पाटील यांना निवडणूक लढवायची झाल्यास त्यांना राष्ट्रवादीत यावे लागेल. त्यांची याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चाही सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यास आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढू, असे आढळराव यांनी शुक्रवारीच स्पष्ट केले आहे. मात्र, आढळरावांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी विरोध दर्शविला आहे. ज्यांच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष केला. ज्यांनी आम्हाला त्रास दिला, आता त्यांच्या बरोबर काम करायचे असेल, तर आम्ही घरी बसू, असा सूचक इशारा मोहिते यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार मोहिते यांच्यासह इतर आमदारही आढळराव यांना राष्ट्रवादीत घेऊन त्यांचे काम करण्यास फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे डॉ. कोल्हे यांच्या विरोधात कोणाला उभे करायचे, असा प्रश्न अजित पवार यांच्यासमोर उभा राहिला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले प्रदीप कंद यांना पुन्हा राष्ट्रवादीमध्ये घेऊन त्यांना शिरूर लोकसभेची उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्याबाबतही अंतिम निर्णय झालेला नाही.

शिरूर लोकसभा मतदारसंघात आपल्याला विजय मिळवायचा असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील हक्काचा उमेदवार असणे गरजेचे आहे. त्यामुळे या मतदारसंघातून राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निवडणूक लढवावी, असा हट्ट आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी धरला आहे. वळसे पाटील यांच्याशी याबाबत चर्चा केली जात आहे. मात्र, लोकसभेची निवडणूक लढविण्यास वळसे पाटील इच्छुक नाहीत. त्यामुळे त्यांना तयार करण्याची जबाबदारी स्वतः अजित पवार यांनी घेतली असल्याचे समजते.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड, जुन्नर, आंबेगाव या विधानसभा मतदारसंघात वळसे पाटील यांचे काम मोठे आहे. तेथे त्यांना मानणारा मतदारवर्ग मोठा आहे. भोसरी, हडपसर आणि शिरूरमध्येही वळसे पाटील यांना ओळखणारा मतदार असल्याने कोल्हे यांच्या विरोधात लढण्यास सोपे होणार आहे. त्यामुळे वळसे पाटील यांनीच येथून लढावे, अशी चर्चा आता राष्ट्रवादीत सुरू झाली आहे.

आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत बंड करून भाजपला पाठिंबा देताना अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अतिशय निष्ठावान अशी ओळख असलेले दिलीप वळसे पाटील यांनाही आपल्याबरोबर येण्याचा हट्ट धरला होता. पवारांची साथ सोडून वळसे पाटील हे अजितदादांसोबत जाणार नाहीत, असा ठाम विश्वास अनेकांना होता. मात्र, अजितदादांच्या हट्टापुढे वळसे पाटील यांचे काहीही चालले नाही आणि त्यांनीही शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिरूर लोकसभा वळसे पाटील यांनीच लढवावा, असा हट्ट आता अजितदादा यांनी धरला आहे. अजितदादांचा हा दुसरा हट्ट आता वळसे पाटील पूर्ण करणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT