Amol Kolhe
Amol Kolhe Sarkarnama
पुणे

खासदार होताच अवघ्या अडीच वर्षांतच अमोल कोल्हेंवर एकांतवासाची वेळ का आली?

उत्तम कुटे

पिंपरी : अभिनेते असलेले डॉ. अमोल कोल्हे हे २०१९ मध्ये शिरुरमधून (जि. पुणे) राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून खासदार झाले. त्यानंतर नेते आणि अभिनेते असा दुहेरी प्रवास सुरु झाला. मात्र, अभिनेते असताना त्यांना कधीच चिंतनासाठी एकांतवासात जाण्याची वेळ आली नव्हती. मात्र, ते खासदार झाले आणि अवघ्या अडीच वर्षांतच त्यांच्यावर ही वेळ आली, त्यामुळे अभिनेत्याला नेता होणे मानवले नाही का, अशी चर्चा आता शिरूरच नाही, तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात रंगली आहे. (Why did Amol Kolhe need for solitude within two and half years of becoming MP?)

खासदार कोल्हे हे रविवारपासून (ता. ७ नोव्हेंबर) एकांतवासात गेले आहेत. आपला बॉडीगार्ड अथवा वाहनचालक यांना न घेताच ते गेल्याने गूढ आणखी वाढले आहे. त्यांच्या स्वीय सहाय्यकांनाही त्यांनी काहीच सांगितलेले नाही. किती दिवस जाणार वा किती दिवसांनी परतणार, याचीही त्यांनी वाच्यता केलेली नाही. मात्र, त्यांची पुणे व नारायणगाव येथील जनसंपर्क कार्यालये सुरू आहेत. पण, ते राज्यात म्हणजे देशातच आहेत की परदेशात गेलेत याबद्दलही कुणाला काही सांगता आलेले नाही. तसेच त्यांच्या डॉक्टर पत्नींचा सोमवारी (ता. ९ नोव्हेंबर) संपर्क झाला. तेव्हा त्या मुंबईत होत्या.

दरम्यान, मानसिक थकवा घालविण्याकरिता चिंतनासाठी जात असल्याची पोष्ट कोल्हे यांनी रविवारीच फेसबुकवर टाकली होती. ती टाकताना मावळतीच्या सूर्याकडे पाहत असल्याचे त्यांचे छायाचित्र खूप काही सांगून गेले. या भावनिक पोष्टवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. पण, त्यातील अनेकांनी कोल्हेंवर टीका करणाऱ्या आहेत. बैलगाडा मालकांना दिलेल्या आश्वासनाबद्दलही चिंतन करा, असा टोला एका नेटकऱ्याने लगावला आहे. असं काय काम केलं की थकवा आला. परदेशात जायचं असेल, अशी कोपरखळी दुसऱ्या एका नेटकऱ्याने मारली. खासदारकी झेपली नाही वाटतं? अशी विचारणा आणखी एकाने केली आहे. नवीन मालिका आहे? असा प्रश्न उपस्थित करीत त्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.

पिंपरी-चिंचवडचे डॉ. कोल्हे प्रतिनिधीत्व करतात. सोशल मीडियात उमटलेल्या काही बोचऱ्या प्रतिक्रियांसारखी चर्चा येथेही गेल्या दोन दिवसांत ऐकायला मिळाली. जास्त कामे होतात की कामंच होत नाहीत; म्हणून चिंतन करण्याची पाळी आलीय, अशी चर्चाही रंगत आहे. यापूर्वीचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे सलग तीनदा निवडून येऊनही त्यांना एकदासुद्धा एकांतवासात जाण्याची वेळ आली नाही, याकडे लक्ष वेधत अडीच वर्षांतच का तुम्हाला एकांतवासात जावे लागले, अशी प्रश्नार्थक कुजबूज सुरू आहे.

दरम्यान, खासदार कोल्हेंची प्रमुख भूमिका असलेली राजे संभाजी महाराजांवरील मालिका कधीच संपली आहे, दुसरी मालिका वा चित्रपटांचेही त्यांचे चित्रीकरण सध्या सुरु नाही. मग, तरीही त्यांना का एकांतवासात जावे लागले, हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना सतावतो आहे. त्यामुळे अभिनेते होते; तोपर्यंत ही समस्या नव्हती. नेते झाल्यावर ती उद्भवली, त्यामुळे राजकारण मानवले नसल्याची चर्चा त्यांच्या हितचिंतकांमध्ये सुरु झाली आहे. तर, कोरोना झाल्याने आलेला थकवा किंवा नैराश्य घालवण्यासाठी ते एकांतवासात गेल्याचेही चर्चा रंगली आहे. सिंहावलोकनाची वेळ अशी सुरवात असलेल्या त्यांच्या पोष्टमुळे त्यांचे काही निर्णय चुकले का, त्यामुळे ही वेळ आली का असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, काही निर्णयांचा फेरविचार या चिंतनात करणार असल्याची कबुली त्यांनीच या पोष्टव्दारे दिली आहे. काही टोकाचे निर्णय घेतले, असेही त्यांनी त्यात नमूद केल्याने या निष्कर्षाला आणखी दुजोरा मिळतो आहे.

दरम्यान, त्यांचे कट्टर राजकीय विरोधक शिवसेना उपनेते, माजी खासदार आढळराव यांनी मात्र कोल्हेंच्या चिंतनावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. कारण शिरूर लोकसभा मतदारसंघच नाही, तर पुणे जिल्ह्यात व त्यातही खेड तालुक्यामध्ये राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झालेले आहेत. त्यात आणखी भर पडू नये; म्हणून संधी मिळूनही आढळरावांनी या विषयावर बोलणे टाळले. हीच भूमिका भाजपनेही घेतल्याचे दिसून आले. भोसरीचे भाजप आमदार आणि पक्षाचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्याकडूनही कोल्हेंच्या एकांतवासावर भाष्य करण्यात आलेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT