Prakash Ambedkar Sarkarnama
पुणे

Koregaon Bhima Inquiry Hearing : कोरेगाव भीमा चौकशी सुनावणीमधून आंबेडकर का पडले बाहेर? म्हणाले...

Chaitanya Machale

Pune News : कोरेगाव भीमा चौकशी आयोगाची सुनावणी सोमवारी पुण्यात सुरू होती. हे कामकाज सुरू असताना वंचित बहुजन पक्षाचे संस्थापक ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह हर्षाली पोतदार आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांची उलट तपासणी झाली. या वेळी आंबेडकर सुनावणी पूर्ण होण्यापूर्वीच अचानक तेथून बाहेर पडले.

कोरेगाव भीमा आयोगासमोर माझी उलट तपासणी अंतिम टप्प्यात सुरू होती. त्यावेळी कोरेगाव भीमाची दंगल पोलिसांनी घडविली आहे. त्यावेळी जी नावे घेतली आहेत, त्यांनीच दंगल घडविली आहे, असा पुनरुच्चार आंबेडकर यांनी केला. मात्र, आयोगासमोर हे प्रकरण दुसरीकडे वळविण्याचे काम सुरू आहे.

ते माझ्या तोंडून वदवून घेण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे या सुनावणीतून मी बाहेर पडतो. असे आयोगाला सांगून मी बाहेर पडलो असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. कोरेगाव भीमा येथे 2018 मध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत आवश्यक पुराव्यांच्या नोंदीसाठी ही आयोगाची शेवटची सुनावणी असण्याची शक्यता होती. त्यामुळे कोणतीही स्थगिती दिली जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे या सुनावण्यांना महत्त्व आले होते. या सुनावणीसाठी आंबेडकर यांना उपस्थित राहण्याचे समन्स काढण्यात आले होते. अर्धवट सुनावणी सोडून बाहेर पडल्याबद्दल आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले, या आयोगाला न्यायालयाचे अधिकार दिले नसल्याने त्या आयोगासमोर उभे राहायचे नाही असे ठरविले होते. मात्र, आयोगाने आपल्याला समन्स काढले आणि नागरिक म्हणून आपल्याला उभे राहावे लागेल म्हणून सुनावणीला आलो.

दरम्यान, आयोगाचे सरकारी वकील शिशिर हिरे यांनी वस्तुस्थिती मांडली. हिरे म्हणाले, आंबेडकर यांची सरकार पक्षातर्फे त्यांची उलटतपासणी घेण्यात आली. एल्गार परिषदेचे आयोजन आणि त्यापूर्वीच्या गोष्टींचा अंतर्भाव होता. कोरेगाव परिसरात हिंसाचार झाला. त्यानंतर 2 जानेवारीला आंबेडकर यांनी 3 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.

त्यावेळी महाराष्ट्रात झालेल्या हिंसाचाराच्यावेळी खासगी, सरकारी मालमत्तेच्या नुकसानास कोण जबाबदार हा प्रश्न होता. या प्रकरणात राज्यातील 34 पोलिस मुख्यालयातील 571 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. 5 कोटींपेक्षा जास्त सरकारी आणि खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्याबाबत जबाबदारी कोणाची, असा प्रश्न आंबेडकर यांना विचारला ? त्यावेळी उत्तर न देता त्यांनी या कामकाजातून स्वतःला बाजूला करून घेतले आहे.

दंगल अचानक होत नाही...

कोरेगाव भीमा तसेच शिक्रापूर परिसरात राज्य सरकारने पुरेशी व्यवस्था केली होती. पोलिसांनी कोठेही हलगर्जीपणा केला नसल्याचे हे आम्ही सप्रमाण आयोगासमोर ठेवले आहे. कोट्यवधी रुपयांचे स्थानिकांचे नुकसान झाले तरी दोन्ही समाजाला समोरासमोर येऊ दिले नाही. तसेच पोलिसांनी गोळीबारही केला नव्हता.

कोणतीही दंगल अचानक होत नसते. त्यामागे नियोजन असते. वढूला 28 डिसेंबरच्या रात्री प्रक्षोभक असा फलक लावला जातो. याबाबत सविस्तर खुलासा दोषारोपपत्रात आहे. ही न्यायप्रविष्ट बाब असून, त्याबाबत सविस्तर बोलता येणार नाही, असे हिरे यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT