Dilip Walse patil-Purva Walse Patil-Devdatta Nikam Sarkarnama
पुणे

Ambegaon Politic's : ज्यांनी वळसे पाटलांचा फोटो देव्हाऱ्यात ठेवला; तेच आज त्यांच्या अंताची प्रार्थना करीत आहेत का? पूर्वा वळसेंचा भावूक सवाल

Purva Walse Patil News : आंबेगावत 35 वर्षे जनतेची अविरत सेवा केलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल असे बोलताना आपली जीभ जराही कचरली नाही का? असा सवाल पूर्वा वळसे यांनी केला आहे.

डी. के. वळसे पाटील

Manchar, 01 December : आंबेगाव मतदारसंघात विधानसभा निवडणुकीतील टोकाचा संघर्ष निकालानंतरही पहायला मिळत आहेत. मैदानावरची लढाई संपली असून आता सोशल मीडियाद्वारे एकमेकांवर जोरदार प्रहार करण्यात येत आहेत. दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी विरोधकांच्या आभार मेळाव्यात ‘विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांना आपल्याला लवकरच सामोरे जावे लागेल’ असे विधान झाल्याचा दावा करत विरोधकांचा सडेतोड शब्दांत समाचार घेतला आहे. राजकारण आणि निवडणुका हेच कृतघ्नपनाचा कळस गाठलेल्या या लोकांसाठी सर्वस्व आहे का? एखाद्या आजारी व्यक्तीच्या मरणाची तुम्ही कामना करणार का? असा सवाल त्यांनी विरोधकांना केला आहे.

पूर्वा वळसे पाटील (Purva Walse Patil) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या राजकीय जीवनात विरोधकांबद्दल कधीही वाईट शब्द काढलेले नाहीत. त्यांनी अनेक पदे भूषविली आहेत. मात्र, कोणीही त्यांच्याबद्दल कधीही वाईट बोलले नाही.

काही महिन्यांपूर्वी दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा एक दुर्दैवी अपघात झाला होता, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांच्यावर एक मोठी शस्त्रक्रिया झाली असून ते या दुखापतीतून बाहेर पडण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न आम्ही संपूर्ण कुटुंबीय करत आहोत. मोठ्या शस्त्रक्रियेमुळे वळसे पाटील यांची प्रकृती थोडीशी खालावलेली आहे. ते या संकटावर मात करून थोड्याच दिवसात पूर्वीसारखे ठणठणीत व्हावेत, अशी आम्ही दररोज परमेश्वराकडे प्रार्थना करत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

विरोधकांच्या आभार मेळाव्यात बोलताना मात्र दिलीप वळसे पाटील यांच्या प्रकृतीवरून ‘विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांना आपल्याला लवकरच सामोरे जावे लागेल’ असे अभद्र वक्तव्य करण्यात आले होते. हे ऐकल्यानंतर काय बोलावे मला सुचत नाही. वळसे पाटलांचा फोटो ज्यांनी आपल्या देव्हाऱ्यात लावला होता, तेच आज त्यांच्या अंताची प्रार्थना करीत आहेत? अशी खंतही पूर्वा वळसे पाटील यांनी बोलून दाखवली आहे.

निवडणुका तुम्ही नक्की लढा, जिंका, त्याला हरकत असण्याचे काहीही कारण नाही; पण या गोष्टी करत असताना उन्माद किती असावा? सत्ता मिळवण्याच्या नादात आपण किती खालच्या पातळीला जात आहोत? शत्रुत्वाच्या नादात आपण कोणतीच मर्यादा ठेवली नाही का? सुसंस्कृतपणाचा वारसा सांगणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील राजकारणाचा स्तर इतका खाली गेलाय का? आंबेगावत ३५ वर्षे जनतेची अविरत सेवा केलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल असे बोलताना आपली जीभ जराही कचरली नाही का? असा सवाल पूर्वा वळसे यांनी केला आहे.

त्या म्हणाल्या, ज्या आदरणीय वळसे पाटील यांनी आम्हाला कुटुंब म्हणून नेहमी कमी वेळ दिला; परंतु या तालुक्यातील जनतेसाठी ते अहोरात्र उपलब्ध राहिले, त्यांच्या मरणाची वाट पाहेपर्यंत काही लोकांची या मजल गेली आहे का? त्याच जोरावर आमदारकीची स्वप्ने काही लोक पाहत आहेत का? भविष्यात यांच्यासारख्याच लोकांना आपला सुसंस्कृत तालुका आपले प्रतिनिधी म्हणून स्वीकारणार आहे का? ज्यांनी तुम्हाला मोठे केले, घडवले त्यांच्याबद्दल तुमच्या मनात असे विचार आहेत का?

कृतघ्नपनाचा कळस गाठलेल्या या लोकांसाठी राजकारण आणि निवडणुका हेच सर्वस्व आहे का? एखाद्या आजारी व्यक्तीच्या तुम्ही मरणाची कामना करणार का? माणूस आणि माणुसकीला काहीच किंमत उरली नाही का? अशा असंख्य प्रश्नांचे काहूर माझ्या मनात दाटून आले आहे. असे काही ऐकून त्यावर उत्तर देण्यापेक्षा मला नकोच ते राजकारण, असे वाटू लागले आहे, असेही पूर्वा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT