Sanjay Raut
Sanjay Raut  Sarkarnama
राज्य

यंदा उत्तर प्रदेशात शिवसेनेला मिळणार पहिला मंत्री ; संजय राऊतांची भविष्यवाणी..

सरकारनामा ब्यूरो

गोरखपूर : उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या (UP Election) मैदानात शिवसेनेने (Shivsena) कंबर कसली असून उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ३७ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातून राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे नेते-खासदार संजय राऊत (Sanjay Raut) व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) प्रचारासाठी उत्तरप्रदेश मोहिमेवर गेले आहेत. दरम्यान, गोरखपूरमध्ये शिवसेना उमेदवाराच्या प्रचारसभेत राऊतांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आणि यंदाच्या निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशात शिवसेनेचा पहिला मंत्री होईल, असा दावा देखील केली आहे. त्यांनी केलेल्या या दाव्यावर राजकीय चर्चांना मात्र उधान आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात भाजप नेते आणि राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्यातही शिवसेना आणि भाजप नेत्यांचा वाद तर विकोपाला गेला आहे. या दोन्हीही पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाहीत. त्यातच उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता असल्याने तेथे शिवसेनेने आपला चांगलाच जोर लावला आहे. भाजपच्या उत्तर प्रदेशात अडचणी वाढवण्यासाठी शिवसेनेने आपले 37 उमेदवारही रिंगणात उतरवले आहेत. यामुळे उत्तर प्रदेशात जावून भाजपला डिवचण्याचे काम शिवसेनेकडून केले जात आहे. याचसाठी शिवसेनेकडून अदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात संजय राऊत आणि एकनाथ शिंदेना प्रचारासाठी पाठवण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये शिवनेना नेते राजू श्रीवास्तव यांच्या प्रचार सभेत बोलतांना राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलतांना त्यांनी युपी आणि मुंबईचे नाते तेथील मतदारांना सांगितले. आम्ही जेव्हा मुंबईत फिरतो किंवा मुंबईपासून पुण्यापर्यंत कुठेही जातो, तेव्हा लाखो हिंदी भाषिक लोक दिसतात. मुंबईत म्हणाल तर निम्मी मुंबई हिंदी भाषेत बोलते. त्यातही जिथे आम्ही जातो, तिथे १० पैकी ६ लोक सिद्धार्थनगरचे असतात. हे आमचे नाते उत्तर प्रदेशसोबत आहे. तसेच, जेव्हा मी स्टेजवर आलो, तर मला वाटले की, मी मुंबईतच सभा घेतोय, अश्या शब्दात राऊतांना तेथील मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.

राऊत म्हणाले, यंदाच्या निवडणुकांनंतर उत्तर प्रदेशात शिवसेनेचा पहिला मंत्री होईल. राजू श्रीवास्तव यांच्या हातात शिवसेनेचा धनुष्यबाण आहे. हा धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरेंचा आहे. या धनुष्यबाणाने देशाच्या शत्रूंचा वारंवार खात्मा केला आहे. हा धनुष्यबाण घेऊन तुम्ही राज्याच्या विधानसभेत जाल आणि शिवसेनेचे पहिले मंत्री देखील व्हाल, असा दावा राऊतांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT