महायुती सरकार जाणार, हे जवळपास निश्चित मानले जात होते. त्यादृष्टीने महाविकास आघाडीत हालचाली सुरू झाल्या होत्या, इनकमिंगही वाढले होते. महायुतीच्या नेत्यांमध्ये आत्मविश्वास दिसत होता, मात्र त्यांची चिंता वाढलेलीच होती. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे महाविकास आघाडीत Maha Vikas Aghadi निश्चिंतता होती. जमिनीवरही महायुतीच्या विरोधात वातावरण आहे, अशी चर्चा होती. एक्झिट पोलमध्येही बरोबरीचा सामना होता, मात्र सामना एकतर्फी झाला! महायुतीला Mayayuti 230 जागा मिळाल्या, महाविकास आघाडी 46 जागांत गुंडाळली गेली. धक्कादायक निकालामुळे ईव्हीएमवरील संशय पुन्हा जागा झाला.
लोकसभा निवडणुकीचा निकाल सहा महिन्यांपूर्वी म्हणजे जूनमध्ये लागला होता. महायुतीला मतदारांनी स्पष्टपणे नाकारले होते. 45 पैकी केवळ 17 जागा महायुतीला मिळाल्या होत्या. भाजपसारखा बलाढ्य पक्ष केवळ 9 जागांमध्ये गुंडाळला गेला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक होते. धक्कादायक या अर्थाने की महायुतीच्या बाजूने इतके सकारात्मक वातावरण आहे, हे भल्याभल्यांच्या लक्षात आले नाही. इतके मोठे यश मिळेल, असा विश्वास खुद्द महायुतीच्या नेत्यांनाही नव्हता, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील जाहीर सभेकडे लोकांनी अक्षरशः पाठ फिरवली होती.
गेल्या पाच वर्षांत राज्यात एेतिहासिक राजकीय घडामोडी घडल्या होत्या. विविध पक्षांच्या नेत्यांच्या भाषेचा स्तर खालावला होता. एकमेकांचा आदर करण्याची महाराष्ट्राची राजकीय संस्कृती लोप पावली होती. 2019 मध्ये शिवसेना - भाजपची युती तुटल्यानंतर असे प्रकार सुरू झाले होते. युती तुटल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी स्थापन झाली. महाविकास आघाडीचे सरकार आले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्या दिवसापासून सुरू झालेल्या राजकीय घडामोडींचा अंत सरत्या वर्षात झाला.
लोकसभा निडणुकीत महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या होत्या. सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. ते विजयी झाले आणि पुन्हा काँग्रेसकडे परतले. त्यामुळे हा आकडा 31 झाला. काँग्रेस 17 जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. तिकडे, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलन सुरू झालेले होते. मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना धडा शिकवा, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होती. सुरुवातीच्या टप्प्यात अंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला होता.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी महायुतीला जेरीस आणले होते. विजयसिंह मोहिते पाटील यांना भाजपमधून पुन्हा आपल्या पक्षात आणण्यात त्यांना यश आले होते. या सर्व बाबी महायुतीच्या विरोधात गेल्या होत्या. पक्षांच्या फोडाफोडीला मतदारांनी उत्तर दिले होते. विधानसभा निवडणुकीतही असेच होईल, अशी वातावरणनिर्मिती झाली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता येणार, असे वातावरण निर्माण झाले होते.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीचे नेते सावध झाले. सरकारने या निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. याअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात आले. मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण निर्माण झाले होते. तसे व्हावे, यासाठी सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांनी काळजी घेतली होती. मराठा समाजाला आरक्षण द्या, मात्र ओबीसीमधून नको, अशी भूमिका छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांनी घेतली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणावर जरांगे पाटील ठाम राहिले. आंदोलकांवरील लाठीमारामुळे मराठा समाजात असंतोष खदखदत होता.
हे देखिल वाचा-
लाडकी बहीण योजनेचा परिणाम झाला. महिलांची मते महायुतीकडे वळली. मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठा आणि ओबीसी मतांचे ध्रुवीकरण झाले. ओबीसींसह मायक्रो ओबीसीही महायुतीच्या बाजूने गेले आणि अनपेक्षित असा निकाल लागला. महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का होता. या निकालाने महाराष्ट्राची राजकीय दिशाच बदलून टाकली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री यशोमती ठाकूर आदी दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. लोकसभेला आपल्या पत्नीला निवडून आणू न शकलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल 41 जागा मिळाल्या.
गद्दारी, 50 खोके एकदम ओके आदी मुद्दे निकाली काढणारा हा निकाल ठरला. ठाकरे कुटुंबातील अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आदित्य ठाकरे यांच्यानंतर अमित हे निवडणूक लढवणारे दुसरे ठाकरे ठरले, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेले राज ठाकरे विधानसभेला स्वबळावर मैदानात उतरले होते, मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीलाही एकही जागा मिळू शकली नाही.
हे देखिल वाचा-
निकाल लागल्यानंतर रुसव्या फुगव्यांचे सत्र सुरू झाले. मुख्यमंत्री कोण होणार, हे ठरवण्यासाठी विलंब झाला. धक्कातंत्र वापरत नव्याच चेहऱ्याला भाजपकडून संधी दिली जाईल, अशी चर्चा सुरू झाली होती. यादरम्यान, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदावर अडून बसले होते. अजितदादा पवार यांनी योग्य टायमिंग साधत मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिंदे यांची गोची झाली. आजारपणामुळे तीन दिवस त्यांनी आपल्या मूळगावी मुक्काम ठोकला होता. शिंदे यांचा गृह मंत्रालयाचा हट्टही भाजपने पूर्ण केला नाही.
गेल्यावर्षी मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी धक्कातंत्र वापरत नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्रिपद दिले होते, मात्र महाराष्ट्रात त्यांचे काहीएक चालले नाही. नवा चेहरा देण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र फडणवीस यांची राज्यातील पक्षसंघटनेवरील मजबूत पकड त्या प्रयत्नांच्या आड आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही फडणवीस यांच्या पाठिशी उभा राहिला. त्यामुळे पुन्हा एकदा फडणवीस यांच्या गळ्यात माळ पडली. राष्ट्रवादी काँग्रेसने छगन भुजबळ. भाजपने सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद नाकारत मोठे धक्के दिले. अशा तऱ्हेने गेल्या पाच वर्षांतील राजकीय घडामोडींना या निकालाने पूर्णविराम दिला.
या निवडणुकीच्या निमित्ताने ईव्हीएमवरील संशय पुन्हा जागा झाला, कारण निकालच तसे धक्कादायक लागले. माळशिरस (जि, सोलापूर) मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तम जानकर विजयी झाले. मारकडवाडी या गावातून त्यांना आघाडी मिळाली, मात्र ती त्यांना अपेक्षित अशी नव्हती. त्यामुळे मारकवाडीच्या नागरिकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करत स्वतःच तशी तयारी सुरू केली. शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या गावाला भेट दिली. त्यामुळे वातावरण तापले, देशभरात चर्चा झाली.
मारकडवाडीचे पडसाद देशभरात उमटले. विरोधकांनी विविध ठिकाणी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन केले. नवीन वर्षांत मारकडवाडीला राहुल गांधी यांनीही भेट देण्याचे नियोजन केले आहे. गंमत अशी की, ईव्हीएमच्या समर्थनार्थ, विरोधी पक्षांचे मुद्दे खोडून काढण्यासाठी भाजप आणि महायुतीचे नेते समोर येऊ लागले. प्रत्यक्षात, निवडणूक आयोगाने या शंकांचे समाधान करणे अपेक्षित होते. भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हेही मारकडवाडीला गेले आणि त्यांनी शरद पवार यांच्यावर नेहमीप्रमाणे मर्यादा सोडून टीका केली. त्यामुळे ईव्हीएमवरील संशय बळावण्यास मदतच झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.