Abhijeet Patil  Sarkarnama
विशेष

Abhijeet Patil : पवारांच्या दौऱ्याचे स्टेअरिंग अभिजित पाटलांच्या हाती; पंढरपूर ते सोलापूर प्रवासाची रंजक कहाणी...

Vijaykumar Dudhale

NCP Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सोलापूर दौरा आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचे सारथ्य हा आता शिरस्ता बनत चालला आहे. काही वर्षांपर्यंत पवारांच्या गाडीचे स्टेअरिंग हे माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या हाती असायचे. पण, राष्ट्रवादीतील फुटीनंतर अनेक नेत्यांनी अजित पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि अभिजित पाटील हे पवारांच्या राष्ट्रवादीचे सोलापूरच्या ग्रामीण भागातील चेहरा बनले. (Abhijeet Patil became driver of Sharad Pawar's car during Solapur tour)

साखर कारखानदारातील चर्चेतील चेहरा अभिजित पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पंढपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वीच पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना जिंकत आपली लोकप्रियता सिद्ध केली होती. त्यावेळी अजित पवार हेही राष्ट्रवादीसोबत एकत्र होते. सोलापूर जिल्ह्यातही राष्ट्रवादीत नेत्यांची मांदियाळी होती. अनेक बलाढ्य नेते पक्षात होते. त्यामुळे नवख्यांना तसे राष्ट्रवादीत अजून महत्त्व यायचे होते. मात्र, अजितदादांनी वेगळी भूमिका घेतली आणि राज्याबरोबर सोलापूरमधीलही बहुतांश नेत्यांनी दादांना साथ देण्याचा निर्णय घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पहिल्या फळीतील नेते अजितदादांसोबत निघून गेल्यानंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सुगीचे दिवस आले आहेत. मात्र, अभिजित पाटील हे सर्वांपेक्षा वरचढ ठरले. विठ्ठल कारखान्याची निवडणूक जिंकून त्यांनी अगोदरच पवारांच्या मनात स्थान मिळविले होते. तीन ते चार साखर कारखाने चालवण्याचा तगडा अनुभव यामुळे ते पवारांच्या एकदम जवळ गेले. त्यामुळे सोलापुरात आल्यानंतर पवारांच्या गाडीचे स्टेअरिंग आपसूकच अभिजित पाटील यांच्या हाती आले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मदतीने उभारण्यात आलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन ७ मे २०२३ रोजी झाले. त्या कार्यक्रमाला अभिजित पाटील यांनी शरद पवार यांना पाचारण केले होते. त्या वेळी विठ्ठल कारखाना ते पंढरपूर पवारांच्या गाडीचे सारथ्य हे अभिजित पाटील यांनीच केले होते. त्यानंतर पंढरपूर ते सोलापूर पवारांची गाडी पाटील यांनीच चालवली होती. विशेष म्हणजे त्या वेळी राष्ट्रवादी एकसंध होती. तरीही आपल्या गाडीचे स्टेअरिंग पवारांनी अभिजित पाटील यांच्या हाती सोपवले होते.

त्यानंतर शरद पवार ज्या ज्यावेळी सोलापूरला आले. त्या वेळी अभिजित पाटील यांनीच पवारांच्या गाडीचे सारथ्य केले. माजी आमदार भाई (स्व.) गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला आल्यानंतरही अभिजित पाटील यांनीच पवारांची गाडी चालवली. त्यावेळी मंगळवेढ्यात पवारांचे जंगी स्वागत झाले होते. त्या वेळी पवारांनी अभिजित पाटील यांना साथ द्या, असे सांगत पंढरपूर-मंगळवेढ्याच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले होते.

माढ्यातील शेतकरी मेळाव्यानंतर शरद पवार यांनी आमदार संजय शिंदे यांच्या फार्महाऊसवर जेवण केले. तेथून पवार हे अभिजित पाटील यांना घेऊन पुण्याकडे गेले हेाते. त्याची सोलापूर जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली हेाती. कारण त्यावेळी पाटील अजून राष्ट्रवादीत आले नव्हते. तत्पूर्वीच पवारांनी पाटलांच्या पारड्यात आपले वजन टाकायला सुरुवात केली होती.

कापसेवाडीच्या कार्यक्रमाला तर खुद्द पवारांनीच अभिजित पाटील यांना बारामतीला बोलावून घेतले हेाते. कापसेवाडीला येताना पाटील यांना आपल्या हेलिकॉप्टरमध्ये घेऊन आले होते. त्यावेळी माढा विधानसभा मतदारसंघात शरद पवार हे आमदार बबनराव शिंदे यांच्याविरोधात अभिजित पाटील यांना उमेदवारी अशी चर्चा रंगली हेाती. तसेच, माढा लोकसभेबाबतही पाटील यांच्या नावाची चर्चा झाली होती.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना भेटायला जातानाही पवारांनी अभिजित पाटील यांना सोबत नेले होते. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीचे अभिजित पाटील हे सोलापुरात चेहरा बनले आहेत. अनेक घडामोडी त्यांच्या माध्यमातूनच सध्या घडत आहेत.

परवा झालेल्या दौऱ्यात तर सांगोल्यापासून सोलापूरमधील हेलिपॅडपर्यंत अभिजित पाटील हेच पवारांचे सारथी बनले होते. सांगोल्यात डॉ. अनिकेत देशमुख यांच्या गणेशरत्न कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले. त्यानंतर मंगळवेढ्यात शिवाजीराव काळुंगे यांच्या कार्यक्रमालाही अभिजित पाटील सोबत होते. मंगळवेढ्यापासून सोलापूर आणि शहरातील सर्व कार्यक्रमाला पवारांसोबत अभिजित पाटील यांची हजेरी हेाती. रे-नगर येथील हेलिपॅडपर्यंत पवारांना सोडायला अभिजित पाटील हेच सारथी हेाते.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीत अभिजित पाटील यांचे वजन कमालीचे वाढले आहे. सोलापूर जिल्ह्याबाबत डावपेच आखताना अभिजित पाटील यांना सोडून एकही बैठक होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीचे अभिजित पाटील हे सोलापुरात चेहरा बनले आहेत, हे मात्र नक्की.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT