Ajit Pawar_Devendra Fadnavis  Sarkarnama
विशेष

Maharashtra Politic's : राजकीय गाठीभेटींना वेग, फडणवीसांची राष्ट्रवादी नेत्यांसोबत चर्चा;अजित पवार गटाला मिळणार ही मंत्रिपदे

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राज्यात राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यांना कोणती खाती द्यायची, याबाबत बैठकांवर बैठका हेात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये सोमवारी मध्यरात्री अडीचपर्यंत ‘वर्षा’वर खलबतं रंगली होती. पुन्हा आज सागर बंगल्यावर फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गाठीभेटी होत आहे. (Ajit Pawar group will get these ministerial posts)

दरम्यान, मंत्रिपद वाटपाच्या या गाठीभेटीत राष्ट्रवादीला (NCP) मिळणाऱ्या खात्याबाबतची माहिती पुढे आली आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना अर्थखाते मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय इतर आठ जणांची खातीही निश्चित झाल्याची माहिती आहे.

अजित पवार गटाला अर्थ, राज्य उत्पादन शुल्क, ग्रामविकास, सामाजिक न्याय, महिला बालविकास, पर्यटन, क्रीडा आणि अन्न नागरी पुरवठा व औषध प्रशासन ही खाती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाली. पवार यांच्यासह इतर आठ आमदारांचा शपथविधीही झाला. त्याला आठ दिवसांपासून जास्त कालावधी उलटून गेले आहेत. मात्र, खातेवाटप होत नसल्याने त्याबाबतची चर्चा राज्यात रंगली आहे. विरोधकांना या तिघांमध्ये समन्वय नसल्याची टीका होत आहे.

दुसरीकडे, अजित पवार यांना अर्थखाते देण्यास एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. पण, त्यांना कुठले खाते द्यायचे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्या पुढे आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अगोदर अर्धा चर्चा झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्षावर पोचले. या तिघांमध्ये तब्बल दीड तास एकत्रित चर्चा झाली. त्यानंतर अजित पवार निघून आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार निघून गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात पुन्हा अर्धा तास चर्चा झाली. पण त्यानंतरही आतापर्यंत तरी खातेवाटप जाहीर होऊ शकलेले नाही. आता सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, सुनील तटकरे यांच्यात चर्चा सुरू आहे. त्यातून कोणता मार्ग पुढे येतो, हे पाहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT