Mumbai, 21 January : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निकालाच्या दिवशी घडलेल्या धक्कादायक घटनेची माहिती दिली. ‘मी सकाळी देवगिरी बंगल्यावर बातम्या बघत होतो. तेवढ्यात एका चॅनेलने ‘अजित पवार पोस्टल मतदानात मागे,’ अशी बातमी दाखवली. ते पाहून आमच्या मातोश्री म्हणजे माझी आई घरातील देवघरासमोर जाऊन बसल्या आणि मळ जपायला सुरुवात केली. तेवढ्यात मला माझ्या मोठ्या बहिणीचा फोन आला, ‘अरे अजित, अशी एक बातमी दाखवत आहेत. आई तर एकदम म्हणजे सीरियस झाली,’ अशी आठवण अजितदादांनी सांगितली.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते. त्या वेळी त्यांनी विधानसभा निवडणूक निकालाच्या दिवशी घडलेला किस्सा सांगितला. ते म्हणाले, माझी आई आता 87 वर्षांची आहे. मी मतदानात मागे आहे, ही बातमी बघितली आणि ती इतकी सिरियस झाली की, बाकीचेही सर्वजण हादरले.
मी त्या चॅनेलला फोन केला. का रे अशी बातमी दाखवली. तत्पूर्वी मतमोजणीशी (Vote Counting) संबंधित लोकांशीही मी बोललो. कोणाशी बोललो, हे आता सांगायला नको. नाही तर तुम्ही कसं काय त्यांच्याशी बोललात, असं तुम्ही म्हणणार. त्यांनी सांगितले की, ‘नाही दादा, पोस्टल बॅलेटमध्ये 75 टक्के मते तुम्हाला आहेत आणि 25 टक्के मते ही समोरच्याला आहेत.’ मी म्हटलं त्या ठिकाणी बातमी दाखवत आहेत, त्यावर ‘त्याला काहीच अर्थ नाही,’ असेही अजितदादांनी नमूद केले.
अजित पवार म्हणाले, मी चॅनेलच्या प्रमुखांशी बोललो, तर ते म्हणाले, ‘दादा तशी बातमी दाखवल्याशिवाय आमचा टीआरपी वाढत नाही. त्यानंतर कळणारच आहे ना? मतमोजणी थोडी पुढं गेल्यानंतर आम्ही सांगणारच आहेत ना, अजित पवार हे वीस हजार, पंचवीस हजारांनी पुढे म्हणून... अरे म्हटलं, शहाण्या माझी आई 87 वर्षांची आहे. तिनं धसका बिसका घेतली की, माझा अजित काय पराभूत होतो की काय? म्हणून तर...
सांगायचं तात्पर्य हेच आहे की, यातून बऱ्याच काही गोष्टी घडू शकतात. थोडंसं आपल्या हातात आहे; म्हणून काहीही व्हायला नको, अशी माझी विनंती आहे. आज माध्यम क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. मीडिया ट्रायल हा एक गंभीर प्रकार आहे. आम्ही सार्वजनिक काम करत असताना राजकीय हस्तक्षेप नसला पाहिजे, पारदर्शक काम तिथं झालं पाहिजे. असा माझा आग्रह असतो. पण न्यायालयाच्या कामात हस्तक्षेप करण्यासारखा प्रकार माध्यमांनी टाळला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.