Uddhav Thackeray-Ajit Pawar
Uddhav Thackeray-Ajit Pawar Sarkarnama
विशेष

महाआघाडीच्या कार्यकर्त्यांना लवकरच गुड न्यूज मिळणार; अजितदादा त्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार येऊन आता दोन वर्ष झाली आहेत. मंत्रीपदी काम करण्याची आम्हाला संधी मिळाली. पण, आमदार आणि कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. त्याअनुषंगानेच महामंडळ वाटपाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी उद्या (ता. ११ फेब्रुवारी) चर्चा करणार आहे. कार्यकर्त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असे मी मुख्यमंत्री ठाकरे यांना सांगणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (ता. १० फेब्रुवारी) मुंबईत दिली. (Ajit Pawar will meet Chief Minister Uddhav Thackeray tomorrow regarding distribution of Mahamandal)

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते, त्यावेळी त्यांनी महामंडळाच्या वाटपाबाबत भाष्य केले.

ते म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर काही दिवसानंतर लगेच कोरोना महामारी आली, त्या कोरोना महामारीत आमची दोन वर्षे गेली आहेत. त्यामुळे महामंडळाचे वाटप लवकर करत महाआघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल. कार्यकर्त्यांची सहनशीलता आता संपली आहे, त्यामुळे मीही मुख्यमंत्र्यांना कार्यकर्त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असे सांगणार आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार असतानाही आम्ही काँग्रेसला जी नावे आली आहेत, त्यानुसार महामंडळे जाहीर करा, असे सांगत होतो. आताही आमची तीच भूमिका आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यिारी यांच्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी उद्या असणार आहोत, असेही अजित पवार यांनी या वेळी बोलताना नमूद केले.

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच

दहावी-बारावीच्या ऑफलाइन परिक्षेसंदर्भात काही शिक्षक मला भेटले. परीक्षांवर बहिष्कार टाकणार, अशी त्यांची भूमिका होती. परीक्षा घेण्याची वेळ आलीय. आता कात्रीत पकडू नका. लोकांचा समज होईल, हे फक्त स्वतःचे हित बघतात. पण, आमच्या पाल्यांचा विचार करत नाहीत, त्यामुळे मी त्यांना तसं सांगितलं आहे, ते आपल्या संघटनांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

एक्साईज विभागाचे अधिकारी अण्णा हजारेंना भेटणार

जीएसटीसंदर्भात अर्थमंत्री म्हणाले की, केंद्राकडे राज्य सरकारचा ३० हजार कोटी रुपये जीएसटी बाकी आहे. कोरोनामुळे केंद्रापुढे ही समस्या निर्माण झाली आहे. आता कोरोना कमी झाला आहे, त्यामुळे पाहूया किती जीएसटी येतोय. वाईन विक्रीच्या परवानगीबाबत एक्साईज विभागाचे काही अधिकारी अण्णा हजारे यांना भेटून या निर्णयाची माहिती देणार आहेत.

कर्नाटकातील घटनेवर भाष्य...

धर्मा धर्मांमध्ये तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. देशात सर्वधर्मसमभाव आहे. घटनेत काय लिहिलंय, याचं आत्मचिंतनही प्रत्येकाने करायला पाहिजे. आपल्या कृतीतून देशातील वातावरण खराब होऊ नये, याची काळजी घ्यायला हवी. पण, दुर्दैवाने काही जण राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अशी कृती करतात, असे कर्नाटकातील घटनेसंदर्भात बोलताना पवार यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT