Ajit Pawar-Harshvardhan Patil Sarkarnama
विशेष

Indapur Politics : ‘आघाडी झाली नाही तरी बेहत्तर...’: अजितदादा महायुतीतही 2019 चा आक्रमक बाणा दाखवतील काय?

Ajit Pawar Vs Harshvardhan Patil : शेवटी वैतागून हर्षवर्धन पाटील यांनीच काँग्रेसचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात जाणे पसंत केले होते.

Vijaykumar Dudhale

Pune News : कोणतीही निवडणूक जवळ आली, की इंदापूरचं राजकारण तापयला लागतं. आताही पुणे जिल्ह्यातील इतर कोणत्याही मतदारसंघांपैकी इंदापूरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात टोकाचा संघर्ष दिसून येतो. आताही माजी मंत्री पाटील यांच्या मुलांनी ‘जे विधानसभेला आमचे काम करतील, त्यांचेच आम्ही लोकसभेला काम करू,’ अशी आव्हानाची भाषा केली आहे. त्यामुळे अजितदादा हे 2019 प्रमाणे याहीवेळी आक्रमक आणि टोकाची भूमिका घेणार का, याकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे. (Loksabha election 2024)

इंदापूरचे राजकारण अत्यंत टोकदारपणे लढले जाते. विशेषतः गेल्या काही वर्षांत अत्यंत चुरशीच्या निवडणुका होत आहेत. सलग वीस वर्षे आमदार आणि मंत्री राहिलेले हर्षवर्धन पाटील यांचा दत्तात्रेय भरणे यांनी 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत पराभव केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी 2014 मध्ये स्वतंत्र लढले होते. त्या निवडणुकीत भरणे यांच्या पाठीशी पवार कुटुंबीय संपूर्ण ताकदीनिशी उभारले होते. त्यानंतरच्या 2019च्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली होती. मात्र, इंदापूरच्या जागेवरून दोन्ही पक्षांमध्ये गरमागरमी सुरू होती. दोन्ही बाजूंकडून टोकाची भाषा बोलली गेली हेाती. (NCP Vs BJP)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील निवडणुकीत राष्ट्रवादीकडून दत्तात्रेय भरणे निवडून आले होते, त्यामुळे इंदापूरची जागा राष्ट्रवादीलाच मिळावी, असा आग्रह अजित पवार यांचा होता, तर हर्षवर्धन पाटील यांचाही दावा कायम होता. दोन्ही नेते इंदापूरच्या जागेवरून आक्रमक होते. विशेषतः अजित पवार यांनी टोकाची भाषा वापरली होती. आघाडी नाही झाली तरी बेहत्तर, पण इंदापूरची जागा राष्ट्रवादीलाच मिळायला हवी, असे ते जाहीरपणे एका सभेतून बोलले होते. काँग्रेसचे नेतेही इंदापूरसाठी आग्रही हेाते. मात्र, शेवटी वैतागून हर्षवर्धन पाटील यांनीच काँग्रेसचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात जाणे पसंत केले होते. त्यामुळे आघाडी तुटेपर्यंत ताणण्याचा प्रश्नच आला नाही. (Dattatray Bharane)

अजित पवारही आता भाजपसोबत सत्तेत गेले आहेत. हर्षवर्धन पाटील हेही भाजपमध्येच आहेत. त्यामुळे इंदापूरच्या जागेवरून पुन्हा संघर्षाची चिन्हे दिसत आहेत. हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील-ठाकरे आणि मुलगा राजवर्धन पाटील यांनी इंदापूरची जागा आम्ही लढवणारच असे स्पष्ट केले आहे. त्यांनी आमची तीन वेळा फसवणूक केली आहे, आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, त्यामुळे विधानसभेला आमचे जो काम करेल, त्यालाच आम्ही लोकसभेला मदत करू, अशी काहींशी आव्हानात्मक भाषा वापरली आहे.

अंकिता आणि राजवर्धन पाटील यांच्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काहीशी सबुरीची भाषा केली आहे. नव्याने राजकारणात आलेल्या तरुणांकडून अशी भाषा केली जाते. त्यावर लगेच प्रतिक्रिया द्यावी, असं काही नसतं. आम्ही हर्षवर्धन पाटील यांच्याशी बसून चर्चा करू, अशी प्रतिक्रिया दिली.

आता बारामती लोकसभेसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव नक्की असल्याची चर्चा आहे, त्यामुळे अजित पवार ही 2019 ची भाषा बोलणार नाहीत. पण, विधानसभेसाठी माजी मंत्री दत्तात्रेय भरणेंसाठी मतदारसंघ सोडवून घेणार की भरणेंना अपक्ष लढवणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT