Ajit Pawar-Chhagan Bhujbal-sunetra Pawar- Atul Benke-Sharad Pawar Sarkarnama
विशेष

Maharashtra Politics : अजितदादा घडाघडा बोला....भुजबळ, सुनेत्रावाहिनी अन्‌ बेनकेही साहेबांना का भेटले?

सरकारनामा ब्यूरो

Mumbai, 20 July : भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केले जाणारे लक्ष्य आणि भाजप कार्यकर्त्यांकडून केला जाणारा कोंडमारा यामुळे महायुतीमध्ये अजित पवार गटाची कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या नेत्यांकडून शरद पवारांची ठराविक दिवसांनंतर भेट घेतली जात आहे. त्यामुळे हे दोन्ही गट एकत्र येण्याची तर सुरुवात तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या या भेटी नेमकं काय सांगतात?, असा सवाल उपस्थित होत आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला सपाटून मार खावा लागल्यानंतर भाजपकडून विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीकास्त्र सोडले जात आहेत. लोकसभेतील पराभवाला अजित पवार यांना जबाबदार धरले जात आहे, त्या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’मध्ये प्रथमतः लेख छापून आला होता. त्यात ‘भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला नको असलेले राजकारण कारणीभूत आहे. अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने स्वतःची किंमत कमी करून घेतली आहे,’ असे म्हटले होते.

‘ऑर्गनायझर’नंतर संघाशी संबंधित असलेल्या विवेक या साप्ताहिकातूनही अजित पवार यांना लक्ष्य करण्यात आले आहे. शिवसेनेला सोबत घेणे भाजप कार्यकर्त्यांनी मान्य केले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणे भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडलेले नाही, असे सांगून अजित पवार गटावर टीका केली होती. भाजपशी संबंधित संस्थांच्या माध्यमातून अजित पवार यांच्यावर नैतिकदृष्ट्या दबाव टाकण्यात येत आहे. दुसरीकडे, भाजपचे कार्यकर्तेही ‘अजित पवार यांना महायुतीमध्ये नको’ अशी भूमिका घेताना दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनीच तशी मागणी मागील पंधरा दिवसांत केली होती, त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवार यांचा कोंडमारा होत असल्याचे मानले जात आहे.

सत्तेच्या चाव्या हातात येत असल्या तरी खुद्द भाजपच्या मातृसंस्थेकडून आणि कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या टीकेमुळे अजित पवार गट हा महायुतीमध्ये घायाळ झाल्याचे मानले जात आहे. तसेच, निवडणुकीत पक्षाला विशेष असं काही हाती लागत नसल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

महायुतीमध्ये अजितदादांना लक्ष्य केले जात असताना राष्ट्रवादीच्या गोटातील काही नेत्यांकडून शरद पवार यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. त्यामुळे अजित पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी पुन्हा जुळवून घेणार का आणि शरद पवार हे मागील सर्व काही विसरून अजित पवारांना पुन्हा सोबत घेणार का?, हा खरा सवाल आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर त्यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात उद्‌भवलेल्या परिस्थितीबाबत पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले होते. मात्र, पवारांसोबतच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नसेल, असे कोणीही ठामपणे म्हणू शकत नाही. भुजबळांच्या भेटीनंतर अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनीही मोदी बागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे. हे सर्व माध्यमांमधून प्रसिद्ध झाले आहे.

भुजबळ, सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार यांच्या गटातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली. म्हणजेच अजित पवार गटातील नेत्यांकडून ठराविक दिवसानंतर शरद पवार यांची भेट घेतली जात आहे. या भेटी या वैयक्तिक असल्याचे स्पष्टीकरण दोन्ही बाजूंकडून दिले जात असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र येण्यासाठीची चाचपणी तर नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून अजित पवार गटाला अवघ्या चार ते पाच जागांवर बोळवण केली होती, त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही अजित पवार गटाला किती जागा मिळतात, हे अनिश्चित आहे. त्यामुळे भाजपकडून केले जाणारे लक्ष्य आणि दुसरीकडे शरद पवार यांच्यासोबत होणाऱ्या गाठीभेटी महाराष्ट्राचे राजकारण कुठे नेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT