Narendra Modi-Amit Shah-Devendra Fadnavis-Chandrakant Patil Sarkarnama
विशेष

Chandrakant Patil : ‘दादा, क्या कर रहे हो...?’; अमित शाहांचा मध्यरात्री दोनला चंद्रकांत पाटलांना फोन

Story Of Chandrakant Patil Ministership : अमित शाह यांनी पहिल्या सात लोकांची मंत्रिपदासाठी यादी पाठवली होती. त्यात कोणताही अनुभव नसलेलो मी होतो. त्यांच्याबरोबर एवढी वर्षे काम केल्यामुळे मी मंत्रिपदाचे काम नीट करेल, असा त्यांचा विश्वास असावा.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 27 July : पदवीधरचा आमदार असल्यामुळे मी 2014 मध्ये मुंबईच्या आमदार निवासात झोपलो होतो. त्यावेळी मध्यरात्री अडीच सुमारास अमित शाह यांचा फोन आला. देवेंद्र फडणवीस दिल्लीतून निघाले आहेत, त्यांना जाऊन भेटा. मी पहाटे चार वाजता त्यांच्याकडे गेलो तर फडणवीसांनी अगोदर जेवणाचा आग्रह धरला.

जेवणानंतर त्यांनी मला सांगितले की तुम्हाला द्या मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे आणि कुठलाही अनुभव नसताना फडणवीसांसोबत पहिल्या सात जणांमध्ये मी मंत्रिपदाची शपथ घेतली, अशा शब्दांत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पहिल्या मंत्रिपदाचा किस्सा सांगितला.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, गुजरातमध्ये तेरा वर्षे काम करत असताना अमित शाहही नुकतेच राजकारणात आले होते. ‘अहमदाबादमध्ये जो कार्यकर्ता असेल, त्याचा पालक मी, असा आग्रह अमित शाह (Amit Shah) यांनी त्यावेळी आग्रह धरला होता. त्या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पालकांना भेटणं, हे माझं काम असायचं. त्यामुळे अमित शाह यांच्याबरोबरच्या भेटीगाठींमधून त्यांचा माझ्यावरच विश्वास वाढला.

मला पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी मिळाली, त्यावेळी अमित शाह हे गुजरातच्या राजकारणात होते. त्या वेळी ते देशाच्या राजकारणात आलेले नव्हते. त्या वेळी मी त्यांना भेटून कोल्हापूरच्या कार्यकर्त्याबाबत विचारायचो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, अमित शाह यांच्याबरोबरच नरेंद्र मोदींशीही असाच माझा संबंध आला होता. आणीबाणीच्या काळात 1975 ते 1977 दरम्यान संघावर बंदी होती. पण, विद्यार्थी परिषदेवर बंदी नव्हती, त्यामुळे संघाच्या अनेक कार्यकर्त्यांना विद्यार्थी परिषदेचे काम करायला सांगितले होते. आणीबाणीच्या 1975 ते 77 या काळात आणि त्याअगोदर चिमणभाई पटेल यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर चिमणभाई पटेल यांना राजीनामा द्यावा लागला. त्या आंदोलनाचे नेतृत्व विद्यार्थी परिषद आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी केले होते.

संघाने त्यावेळी नरेंद्र मोदींना विद्यार्थी परिषदेकडे लक्ष देण्यास सांगितले होते. संघावर बंदी आणल्यानंतर मोदींनी मला विद्यार्थी परिषदेकडे लक्ष द्यायला सांगितले. त्यामुळे माझा मोदींशी संपर्क आला होता. त्यानंतर माझ्या गाठीभेटी वाढल्या. अहमदाबादमधील विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात मी राहायचो. मोदी त्या कार्यालयात यायाचे. त्यांच्याशी रात्री उशिरापर्यंत गप्पा व्हायच्या, असेही त्यांनी नमूद केले.

पाटील म्हणाले, पुढे काळाच्या ओघात आमच्यामधील संपर्क कमी झाला. पण, विश्वास कायम होता. त्यामुळे 2014 मध्ये मी मुंबईतील आमदार निवासात झोपलो होतो. मला अमित शाह यांचा मध्यरात्री दोन वाजता फोन आला. ‘दादा क्या कर रहे हो...’ मी सांगितलं आमदार निवासात झोपलो आहे. त्या वेळी त्यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस दिल्लीतून निघाले आहेत. त्यांना जाऊन भेटा.

मी फडणवीसांना पहाटे चार वाजता भेटायला गेलो. फडणवीस कुठलीही गोष्ट लवकर उघड करत नाहीत, हा त्यांचा स्वभाव आहे. मी त्यांना भेटायला गेलो, तर मला म्हणाले भूक लागलीय पहिलं जेवण करून घेऊ. मी म्हटलं पहाटे चार वाजता तुम्हाला भेटायला का सांगितलं आहे, ते सांगा. जेवल्यानंतर त्यांनी सांगितलं की, उद्या तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे, असेही त्यांनी मला स्पष्ट केले.

अमित शाह यांनी पहिल्या सात लोकांची मंत्रिपदासाठी यादी पाठवली होती. त्यात कोणताही अनुभव नसलेलो मी होतो. त्यांच्याबरोबर एवढी वर्षे काम केल्यामुळे मी मंत्रिपदाचे काम नीट करेल, असा त्यांचा विश्वास असावा आणि त्यांच्या विश्वासाला मी पात्र ठरलो, असं मला वाटतं, असेही चंद्रकांतदादांन म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT