Atul Save-Devendra Fadnavis Sarkarnama
विशेष

Fadnavis CM News : चंद्रकांतदादानंतर सावेंनी बोलून दाखवली खंत;‘ फडणवीसांना उपमुख्यमंत्री म्हणणं आमच्या जिवावर येतं’

Atul Save To Devendra Fadnavis : फडणवीसांचे मुख्यमंत्रिपद हुकल्याची हूरहूर अजूनही भाजपच्या मंत्र्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत असल्याचे दिसून येते.

Vijaykumar Dudhale

Washim News : देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणायचं आमच्या जिवावर येतं, अशी खंत राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी वाशीम येथील ओबीसी जागर यात्रेत बोलताना व्यक्त केली, त्यामुळे फडणवीसांचे मुख्यमंत्रिपद हुकल्याची हूरहूर अजूनही भाजपच्या मंत्र्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत असल्याचे दिसून येते. (BJP minister expressed regret about Devendra Fadnavis's chief ministership)

शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदावरून बिनसले आणि राज्यात महाविकास आघाडीचा जन्म झाला. अडीच वर्षांनंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि राज्यात पुन्हा शिवसेना-भाजपचे युती सरकार सत्तेवर आले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील, असाच दृढ समज होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. मोठ्या जड अंतकरणाने फडणवीसांनी तो निर्णय स्वीकारला.

राज्यात सत्तेत आल्यानंतर झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘छातीवर दगड ठेवून आम्ही फडणवीसांच्या उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय स्वीकारला आहे,’ असे विधान केले होते. त्यावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये कुरबुरी झाल्या होत्या. मात्र, त्या विधानाबाबत सावरासारव करत बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला होता.

दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जावे आणि एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सांभाळावा, असे म्हटले होते. त्यावरून भाजपमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. त्यानंतर गुरुवारी आमदार संतोष बांगर यांनी शिरसाट यांचीच री ओढली होती. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपमध्येही मानापमान असल्याचे दिसून आले.

भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी जागर यात्रेत वाशीम येथे बोलताना गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी पक्षातील नेत्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली. फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणायचं, आमच्या जिवावर येतं. त्यामुळे आम्ही त्यांना माजी मुख्यमंत्री असं संबोधतो, असेही सावे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शिंदे गटाला फडणवीसांना दिल्लीला पाठविण्याची घाई झालेली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा होत असते. त्यामुळे भाजपमध्ये सध्या कमालीची शांतता आहे, पण त्यातही चंद्रकांत पाटील आणि अतुल सावे यांच्यासारखे मंत्री मनातील खदखद बोलून दाखवताना दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT