BJP MLA Sunil Kamble Sarkarnama
विशेष

Sunil Kamble Beat Police : पोलिसाने आमदाराच्या कानशिलात लगावली असती तर...

Ajit pawar : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमोरच पुण्यात भाजप आमदाराने पोलिसावर उचलला हात

अय्यूब कादरी

MLA Beat NCP Office Bearer : असे समजूया, की एखाद्या रुग्णालयात कार्यक्रम सुरू आहे. त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत. सुटी, रजा न मिळाल्यामुळे आधीच त्रस्त असलेला एक पोलिस कर्मचारी या कार्यक्रमासाठी बंदोबस्तावर तैनात आहे. आधीच वैफल्यग्रस्त झालेल्या या पोलिस कर्मचाऱ्याने कुठल्या तरी किरकोळ कारणाचा राग काढण्यासाठी तेथे उपस्थित एखाद्या आमदाराच्या कानशिलात लगावली असती तर..., काय झाले असते आणि तो आमदार सत्ताधारी पक्षाचा असता तर किती हाहाकार माजला असता?

राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री, आमदारांच्या आक्षेपार्ह वर्तनाचे,आक्षेपार्ह वक्तव्यांचे रोज नवनवीन प्रकार समोर येत आहेत. असे वर्तन, वक्तव्ये करण्याची क्षमता काही पक्षनिहाय असण्याची बाब नाही. ती सर्वच पक्षांच्या नेत्यांमध्ये असू शकते. त्याचे प्रदर्शनही सातत्याने होत असते. मात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावणे, हे थोडे नव्हे, तर अतिच झाले. हा प्रकार घडला आहे पुण्यात.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ससून हॉस्पिटलमध्ये आयोजित कार्यक्रमात भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी पोलिसाच्या कानशिलात लगावली. त्यांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्याही कानशिलात लगावली. शिवीगाळही केली. अर्थात, नंतर आमदारमहोदयांनी त्याचा इन्कार केला आहे. मात्र, तोपर्यंत त्यांचा तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजितदादा पवार गट) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या प्रयत्नांनी ससून रुग्णालयात तृतीयपंथीयांसाठी विशेष वॉर्डची उभारणी करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आज शुक्रवारी (ता. ५) झाले. उद्घाटनानंतर अजितदादांचे भाषण सुरू असताना कँटोन्मेंटचे भाजपचे आमदार सुनील कांबळे बाहेर पडत होते. त्यावेळी अजितदादा गटाच्या कार्यकर्त्याशी त्यांची शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे आमदारांनी त्या कार्यकर्त्याच्या कानाखाली आवाज काढला. त्यानंतर व्यासपीठावरून खाली उतरत असतानाही आमदार कांबळे यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याच्याही कानशिलात लगावली.

पोलिस किंवा कार्यकर्त्यावर हात उगारण्याचा अधिकार एखाद्या आमदाराला कुणी दिला आहे का? प्रत्युत्तरादाखल त्या पोलिस कर्मचाऱ्याने आमदारमहोदयांवर हात उगारला असता तर किती गहजब झाला असता! कर्तव्यावर असलेल्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या कामात कुणी अडथळा आणला तर त्याच्यावर कलम 353 नुसार शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला जातो. या प्रकरणात तर एका लोकप्रतिनिधीनेच पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे.

मग संबंधित आमदारावर 353 नुसार गुन्हा दाखल होणार किंवा नाही, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. संबंधित आमदाराने हे कृत्य उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केले आहे. त्यामुळे या आमदारावर गुन्हा दाखल नाही झाला, योग्य कारवाई नाही झाली तर पोलिस दलात 'अॅक्रॉस द लाइन' चुकीचा संदेश जाऊ शकतो.

राज्याचे कॅबिनेटमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे आयोजिलेल्या गौतमी पाटील यांच्या नृत्याच्या कार्यक्रमात कशा प्रकारचे वर्तन केले, हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांविषयी त्यांनी कोणते शब्द वापरले, हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. हा प्रकार ताजा असतानाच आमदाराने कार्यकर्ता आणि पोलिस कर्मचाऱ्यावर हात उगारण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा शरमेने खाली गेली आहे.

उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात योग्य ती कारवाई करायला हवी, अन्यथा दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांचा सर्वात अपयशी गृहमंत्री असा उल्लेख केला होता, तो लोकांना खरा वाटायला लागेल.

(Edited By Roshan More)

SCROLL FOR NEXT