RanjitShinh Naik Nimbalkar-jaykumar Gore-Rahul Kul
RanjitShinh Naik Nimbalkar-jaykumar Gore-Rahul Kul Sarkarnama
विशेष

Sarkarnama Exclusive : माढ्यातील ‘तो बडा नेता’ गळाला लागलाच नाही अन्‌ विमानातील चौथी सीट रिकामीच नागपूरला गेली!

Vijaykumar Dudhale

Solapur, 12 April : माढा लोकसभा मतदारसंघात वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. मात्र, पडद्याआडून बऱ्याच गोष्टी घडत आहेत. मोहिते पाटलांच्या रूपाने वजाबाकी झाल्यानंतर भाजपकडून माढा मतदारसंघातील एका बड्या नेत्याला गळाला लावण्यासाठी थेट नागपूरहून सूत्रं हलवली जात आहेत. संबंधित नेत्याला गळाला लावण्यासाठी ‘माण खटाव’च्या ‘मित्र’नेत्यामार्फत गुरुवारी (ता. 11 एप्रिल) मध्यरात्रीपर्यंत प्रयत्न झाले. ‘त्या नेत्या’ला नागपूरला भेटीला नेण्यासाठी ‘खास विमाना’ची तजबीज केली होती. भाजपच्या महाराष्ट्रातील ‘सर्वोच्च नेत्या’नेही रिंग फिरवली. मात्र, तो नेता काही भाजपच्या गळाला लागलाच नाही, त्यामुळे आज (ता. 12 एप्रिल) दुपारी पुण्याहून नागपूरला गेलेल्या खास विमानातील चौथी सीट रिकामीच उपराजधानीत पोचली.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप (BJP) सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपश्रेष्ठींकडून मतांची जुळवणी सुरू आहे. त्यातून माढा लोकसभा मतदारसंघातील नेत्यांना गळाला लावण्याचे काम भाजपकडून करण्यात येत आहे. त्यातूनच परवा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्याने संबंधित नेत्याशी चर्चा केली होती. मात्र, संबंधित नेत्याने माढ्याच्या खासदाराबद्दल तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात केली. त्यामुळे त्या वरिष्ठ मंत्र्यालाही शांत राहावे लागले. ‘धनुष्यातून बाण सुटला आहे, आता शक्य नाही’ असे त्यांनी संबंधित मंत्र्यांसह सोबत आलेल्या आजी-माजी आमदाराला सांगितल्याची कुजबूज आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्र्याचे प्रयत्न फसल्यानंतर खासदार महोदयांनी उचल खाल्ली आणि थेट भाजपच्या ‘सर्वोच्च नेत्यां’च्या कानांवर गोष्टी घालण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्या माध्यमातून सूत्रं हलविण्यात येऊ लागली. गुरुवारी दुपारी ‘माण खटाव’मधील (Man Khatav) मित्र असलेल्या नेत्याचा सांगावा घेऊन त्यांचा दूत माढ्यातील ‘त्या नेत्या’कडे पोचला. मात्र, संबंधित नेत्याने ताकास तूर लागू दिली नाही. त्यांचा ‘नकारा’चा पाढा कायम होता. संंबंधित दूताच्या माध्यमातून गुरुवारी सायंकाळपर्यंत प्रयत्न सुरू होते.

माढ्यातील ‘तो नेता’ स्थानिक नेत्यामार्फत हाती लागत नाही म्हटल्यानंतर नागपूरहून ‘सर्वोच्च नेत्या’च्या मार्फत सूत्रं हलविण्यात येऊ लागली. माढा भाजपचे स्थानिक नेते, माण-खटावचा ‘मित्र नेता’ आणि नागपूरहून सर्वोच्च नेत्यांच्या मार्फत गुरुवारी (ता. 11 एप्रिल) मध्यरात्रीपर्यंत प्रयत्न सुरू होते.

संबंधित नेत्याला नागपूरला घेऊन जाण्यासाठी पुण्यात ‘खास विमानाची’ बडदास्त ठेवली होती. मात्र, तो नेता काही केल्या हाती लागत नव्हता. माढ्यातील ‘त्या नेत्या’चा फोन बंद झाल्यानंतर त्यांच्या मुलाच्या मोबाईलवरून संपर्क साधला जाऊ लागला. मात्र, पहाटेपर्यंत प्रयत्न करूनही ‘तो नेता’ काही हाती लागला नाही, त्यामुळे आज पुण्याहून नागपूरला जाण्यासाठी आणलेल्या खास विमानातील चौथी सीट रिकामीच ‘उपराजधानी’त गेली.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT