खटाव तालुक्याच्या राजकीय सारीपाटावर कायम काँग्रेस व राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहिले आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात सर्वत्र भारतीय जनता पक्षाची होत असलेली वाढ लक्षात घेता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यावरही भाजप आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यावर असलेले वर्चस्व कायम ठेवण्याचे व निवडणुकीत भाजपचा वारू रोखण्याचे काँग्रेस, राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान असणार आहे.
खटाव तालुक्याचे खटाव-माण, खटाव- कोरेगाव, खटाव- कऱ्हाड अशा तीन विधानसभा मतदारसंघात त्रिभाजन झाले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून मंत्री गोरे यांच्या ताब्यात तालुक्याची सत्ता आहे. या १५ वर्षांच्या काळात माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी तालुक्यातील बहुतांशी जिल्हा परिषद गट, पंचायत समितीवर वर्चस्व ठेवण्यात यश मिळविले आहे. त्रिभाजन झालेल्या खटाव तालुक्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे.
गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत तालुक्यात काँग्रेसचा एक, राष्ट्रवादीचे पाच सदस्य होते, तर पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे आठ आणि भाजपचे दोन सदस्य निवडून आले होते. त्या वेळी मंत्री गोरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले भाजपचे उमेदवार म्हणजे तालुक्याच्या राजकारणातील चंचुप्रवेश मानला जात होता. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गणांच्या आरक्षणामुळे तालुक्यात अनेकांना जिल्हा परिषदेऐवजी पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरावे लागण्याची शक्यता असून, त्यांना दुधावरची तहान ताकावर भागवावी लागणार आहे.
गेल्या पंधरा वर्षांत तालुक्यात मंत्री गोरे यांनी गावोगावी विकासकामांच्या माध्यमातून संघटनात्मक ताकद उभी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत तालुक्यातील जिल्हा परिषद गटांवर व पंचायत समिती गणांवर वर्चस्व मिळविण्यासाठीही त्यांचे प्रयत्न राहणार आहेत. तालुक्यावर असलेले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते कंबर कसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यात भाजपचा वारू रोखण्याचे आव्हान काँग्रेस, राष्ट्रवादी पुढे असणार आहे.
कातरखटाव, खटाव गट सर्वसाधारण असल्याने याठिकाणी उमेदवारीसाठी मोठी चुरस दिसण्याची शक्यता आहे. कातरखटाव गटात भाजपमधून इच्छुकांची संख्या अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी काँग्रेसला तगड्या उमेदवाराचा विचार करावा लागणार आहे. खटाव गटात युवा नेते राहुल पाटील हे उमेदवारीचे प्रमुख दावेदार असून, त्यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष रणधीर जाधव, विश्वस्त गौरव जाधव यांच्यातील उमेदवार पुढे येण्याची शक्यता आहे. तालुक्याच्या उत्तर भागांत काँग्रेसचे असलेले प्राबल्य निर्णायक ठरणार आहे.
पुसेसावळी गटात सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने याठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्या सुनीता कदम, तेजस्विनी कदम, गीतांजली कदम यांच्यातील एक उमेदवारी पुढे येण्याची शक्यता आहे. विरोधकांना सौ. कदम यांच्या विरोधात मातब्बर घराण्यातील महिला उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. मायणी गट इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने याठिकाणी मायणी अर्बन बँकेचे अध्यक्ष सुरेंद्र गुदगे यांचे आव्हान असणार आहे. या ठिकाणी त्यांच्या तोडीस तोड देणाऱ्या उमेदवाराचा भाजपला शोध घ्यावा लागणार आहे.
गट, गणांच्या फेररचनेत तालुक्यात दरूज व गुरसाळे या दोन नव्या गणांची निर्मिती झाली आहे. एरवी अन्य गावांतील उमेदवारांच्या प्रचारासाठी धावणाऱ्या येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आता उमेदवारीची संधी मिळणार असल्याने या नवख्या चेहऱ्यांना पंचायत समितीची दारे खुली झाली आहेत. याशिवाय पंचायत समितीसाठी अन्य गणांतील महत्त्वाच्या गावांतून उमेदवारीसाठी इच्छुकांनी दंड थोपटले आहेत.
विशेषत: औंध गटात इतर मागास प्रवर्ग महिला आरक्षण असल्याने याठिकाणी मंत्री गोरे यांच्या भावजयी, भारती गोरे, सोनल गोरे यांनी उमेदवारीची तयारी केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी गोरे यांच्याविरोधात कोणता उमेदवार देणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
खटाव तालुक्यातील बहुतांशी भागांचा शेतीपाणी प्रश्न सुसह्य झाला आहे. गावोगावी मोठ्या प्रमाणावर विकासकामे देखील मार्गी लागली आहेत. तालुक्यातील तीन साखर कारखाने, एक सूतगिरणी वगळता कोणताही अन्य औद्योगिक प्रकल्प नाही. त्यामुळे या निवडणुकीत तालुक्यातील उर्वरित भागांचा शेतीपाणी प्रश्न, बेरोजगार युवकांना रोजगारासाठी औद्योगिकीकरण आणि गावोगावी झालेली विकासकामे हे मुद्दे निवडणूक प्रचारात येण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या आरक्षण सोडतीमुळे या निवडणुकीत मात्र मोठ्या राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. औंध, निमसोडसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या गटांत मातब्बरांना उमेदवारीपासून दूर राहावे लागणार आहे. याशिवाय लोणीचे युवा उद्योजक योगेश फडतरे, दादाशेठ जाधव यांच्यासारख्या अनेक इच्छुकांना आरक्षणामुळे दूर राहावे लागणार असले, तरी त्यांनी गेल्या काही महिन्यांत राबविलेली संपर्क यंत्रणा निवडणुकीत निर्णायक ठरणारी मानली जात आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वीच हरणाई सूतगिरणीचे संस्थापक, काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांच्यावर काँग्रेसने जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे. श्री. देशमुख यांनी देखील ही जबाबदारी शिरसावंद्य मानून तालुक्यासह जिल्ह्यात काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, जनसंवाद मेळावे, नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.