Harshwardhan Sapkal .jpg Sarkarnama
विशेष

harshvardhan sapkal : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा मोठा निर्णय; तापलेल्या बीड जिल्ह्यात करणार पहिल्यांदाच मुक्काम; काय आहे नेमके कारण ?

Congress State President News : सरकारच्या विरोधात रान पेटवल्यास यश काँग्रेस आणि सपकाळ यांच्या दृष्टीक्षेपात येईल, अशी परिस्थिती असल्यानेच सपकाळ यांनी अंग झटकून कामाला सुरुवात केली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्या पाऊलावर पाऊल टाकले आहे. गेल्याच महिन्यात महाराष्ट्राच्या काँग्रेसपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. राज्यात काँग्रेसमध्ये मरगळ आली आहे. दिग्गज, सरंजामी नेत्यांना डावलून काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची माळ हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात घातली. जमिनीवर उतरून काम केल्यास, लोकांच्या समस्यांसाठी सरकारच्या विरोधात रान पेटवल्यास यश काँग्रेस आणि सपकाळ यांच्या दृष्टीक्षेपात येईल, अशी परिस्थिती असल्यानेच सपकाळ यांनी अंग झटकून कामाला सुरुवात केली आहे.

काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी येत्या काळात बीड जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. गेल्या तीन महिन्यापासून सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर केल्या जात असलेल्या आरोपामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळेच येत्या काळात बीड जिल्ह्यातील विस्कटलेली जातीय वीण पुन्हा नव्याने बांधता यावी म्हणून सपकाळ यांनी पुढाकार घेतला आहे.

बीड जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व जाती संघटनांनी सद्भभावना यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या पदयात्रेत सहभागी होण्याची विनंती करण्यात आली आहे. या सद्भभावना यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील उसवलेली जातीय वीण पुन्हा एकत्रित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्यासह यात्रेत शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांसाठी काम करणारे दीपक नागरगोजे, 100 हून अधिक गायींचा सांभाळ करणाऱ्या शब्बीर मामू, ‘एचआयव्ही’ बाधित मुलांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणारे दिगग्ज मंडळी सहभागी होऊन शांततेचा संदेश देणार आहेत.

सद्भभावना यात्रा काढण्यासाठी बीड जिल्हा दौऱ्यावर येणारे हर्षवर्धन सपकाळ हे ‘एचआयव्ही’ बाधित मुलांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे यांनी उभ्या केलेल्या ‘ इन्फंट इंडिया ’ या संस्थेवर मुक्काम करणार आहेत. एखाद्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने स्वयंसेवी संस्थेत मुक्काम करण्याची ही अलिकडच्या काळातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सद्भभावना यात्रा 8 मार्च काढण्यात येणार आहे. हर्षवर्धन सपकाळ भगवान गड आणि नारायण गड या दोन्ही ठिकाणी जाऊन दर्शन घेणार आहेत. या यात्रेत सहभागी व्हावे यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रणे दिली आहेत. मराठा समाजातील कार्यकर्त्यांना तसेच मराठा मोर्चामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे. हा पक्षाचा कार्यक्रम नाही. त्यामुळे फक्त तिरंगी झेंड्यासह मान्यवर मंडळी यात्रेत सहभागी होणार आहेत.

बीड जिल्ह्यात विविध कारणांमुळे निर्माण झालेली जातीय दुफळी कमी व्हावी, असे प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहेत. काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आखलेल्या या पदयात्रेसाठी प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक नेमण्यात आले आहेत.

जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी जिल्ह्यातील दोन्ही समाजांतील प्रमुख व्यक्तींनी या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी व्यक्तीगत गाठीभेटी घेतल्या असून 46 किलोमीटरच्या या पदयात्रेचा समारोप बीड शहरात होणार असून तेथे एक सभाही घेतली जाणार आहे. या पदयात्रेचे प्रमुख राजेंद्र राख यांनी सद्भभावना निर्माण करायची असल्याने सर्व स्तरातील व्यक्ती, स्वयंसेवी संस्थांना यात्रेत सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT