Congress  Sarkarnama
विशेष

Maharashtra Assembly Elections 2024 : काँग्रेससाठी दशकानंतर संधीची पहाट...

प्रमोद बोडके

Maharashtra Political News : महाराष्ट्रात २०१९ मध्ये एक खासदार असलेला पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वाधिक १३ खासदार (अपक्ष विशाल पाठील यांनी पाठिंबा दिल्याने १४ संख्या) असलेला पक्ष झाला.

या कामगिरीमुळे महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्‍वास वाढला असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपात सर्वाधिक जागा घेऊन मोठा भाऊ होण्याची तयारी काँग्रेसने चालवली आहे. त्यात ते यशस्वी झाल्यास १९९० नंतर (१४१ जागा) महाराष्ट्रात सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी काँग्रेसला मिळणार आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) काँग्रेसने केलेली कामगिरी सध्या चर्चेत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधातील अनेकांच्या तक्रारी लोकसभा निवडणुकीच्या निकालाने झाकोळल्या आहेत. काँग्रेसने लढविलेल्या १७ पैकी १३ जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले.

मुंबई व कोकण विभागात वर्षा गायकवाड, उत्तर महाराष्ट्रात गोवाल पाडवी व शोभा बच्छाव, विदर्भात बळवंत वानखेडे, श्‍यामकुमार बर्वे व नामदेव किरसान, मराठवाड्यात वसंतराव चव्हाण, कल्याण काळे व शिवाजी काळगे,

पश्‍चिम महाराष्ट्रात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व प्रणिती शिंदे यांचा झालेला विजय काँग्रेसला (congress) महाराष्ट्रातील सर्वच प्रांतात जनतेचा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगतो. त्यामुळे विधानसभेसाठी जागा वाटपात काँग्रेसला विदर्भापुरती मर्यादित ठेवणाऱ्यांची अडचण होणार आहे.

नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर लोक स्वीकारतात, याचा प्रत्यय काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत आल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पन्नाशीच्या आतील आणि फारशी राजकीय पार्श्वभूमी नसलेले उमेदवार काँग्रेसकडून मैदानात येण्याची दाट शक्यता आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्यात सक्रिय झालेली काँग्रेस, त्यांना मराठा, मुस्लिम, ओबीसी व दलित मतांची मिळणारी साथ पाहता, आगामी निवडणुकीत काँग्रेस दमदार कामगिरी करण्याची शक्यता आहे.

पराभूतही दखलपात्र

मुंबई उत्तर विधानसभा मतदारसंघातून भूषण पाटील, अकोल्यातून अभय पाटील, नागपूरमधून विकास ठाकरे व पुण्यातून रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे चार उमेदवार लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. या निवडणुकीत अकोला, नागपूर व पुण्यात काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेली मते दखलपात्र आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने या ठिकाणी व्यवस्थित जुळवणी केल्यास विधानसभा निवडणुकीत येथून चांगला निकाल येऊ शकतो.

  • 'मविआ'च्या जागा वाटपात काँग्रेसला विदर्भापुरती मर्यादित ठेवणाऱ्यांची अडचण

  • पन्नाशीच्या आतील, राजकारणाबाहेरील उमेदवार उतरवण्याची सर्वाधिक शक्यता

  • अकोला, नागपूर, पुण्यात लोकसभेतील प्रतिसादानंतर विधानसभेलाही यशाची उमेद वाढली

  • मागील पाच विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी

  • ७५ - १९९९

  • ६९ - २००४

  • ८२ - २००९

  • ४२ - २०१४

  • ४४ - २०१९

अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क - ९८८१५९८८१५

Edited by : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT