Jayant Patil - Devendra Fadnavis Sarkarnama
विशेष

Jayant Patil Vs Fadnavis : ‘विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय तुम्ही करू देत नाही’; जयंतरावांच्या वारावर फडणवीसांचा पलटवार, ‘तुमच्याच मनात काळंबेरं’

Assembly monsoon Session 2025 : विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीच्या मुद्यावरून विधानसभेत आज जोरदार खंडाजगी पहायला मिळाली. त्यात सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यात वाक्‌युद्ध रंगले.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 08 July : विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीच्या मुद्यावरून विधानसभेत आज जोरदार खंडाजगी पहायला मिळाली. त्यात सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यात वाक्‌युद्ध रंगले. त्यात अध्यक्षांच्या बाजूने खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरले, तर भास्कर जाधवांच्या मदतीला जयंत पाटील धावून आले. त्यात फडणवीस आणि जयंतराव यांच्या जोरदार तू तू मै मै झाली. सुरुवातीला जयंत पाटलांनी ‘विधानसभा अध्यक्षांना ‘विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय करायचा आहे, पण तुम्ही करू देत नाही,’ असा वार केला. त्यावर फडणवीसांनी ‘संपूर्ण महाराष्ट्राला अध्यक्ष निष्पक्ष आहेत, हे माहिती आहे. पण, तुमच्यात मनात काळंबेरे आहे, असा पलटवार जयंतरावांवर केला.

विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीच्या मुद्यावर आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले, भारताचे सरन्यायाधीश आज विधीमंडळात येणार आहेत, त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. त्यासाठी आम्हीही येणार आहे. पण या निमित्ताने एक विषय मांडत आहे. मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांनी ऐकून घेतलं पाहिजे. विधीमंडळ जेव्हा त्यांचे स्वागत करेल, त्यावेळी विरोधी पक्षनेतेपदाची जागा रिक्त असणार आहे. म्हणजे विरोधी पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत होणार नाही.

विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्यावर भास्कर जाधव आणि विधानसभा अध्यक्षांमध्ये तु तू मै मै रंगली, तेव्हा मुख्यमंत्री त्यात पडले. पण मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावरही जाधवांचे समाधान झाले नाही. अगदी पाच-सहा सदस्य असताना विरोधी पक्षनेतेपद दिल्याचे ते सांगत होते. जाधव हे तावातावाने बोलत होते. त्यांना साथ देण्यासाठी जयंतराव (Jayant Patil) मैदानात उतरले.

जयंत पाटील म्हणाले, सरन्यायाधीशांच्या स्वागतासाठी आम्ही सारे उत्सुक आहोत. पण, विधीमंडळाकडून स्वागत करत असताना विधानसभेचा विरोधी पक्षनेताच नाही, ही गोष्ट बरोबर नाही. तुम्हाला लवकरात लवकर करायचं आहे. पण कधी. आज करा, उद्या करा पण आपण किती काळ विचार करताय. बरं एवढा विचार करूनही निर्णय होत नाही, याचा महाराष्ट्राला आचंबा आहे.

विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय लवकरात लवकर झाला पाहिजे, ही भावना असणं ठीक आहे. पण आताच करा म्हणणं, कसं योग्य आहे. जयंतराव, आताच तारीख सांगा, असं कसं म्हणता येईल, असं करता येणार नाही, अशी बॅटिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा अध्यक्षांसाठी केली.

त्यावर जयंत पाटील यांनी पलटवार करत विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय करायचा आहे. पण तुम्ही करू देत नाही, असा त्याचा अर्थ होतो आहे, असा हल्ला केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे फक्त तुमच्याच मनात आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की विधानसभेचे अध्यक्ष निःष्पक्ष आहेत, स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. फक्त तुमच्या मनात काळंबेरं आहे, असा हल्लाबोल केला.

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर विरोधी पक्षाच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. सरकारचा धिक्कार केला. त्या वेळी विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय लवकरात लवकर व्हावा, अशी मागणी करत होते. मात्र, जयंत पाटील यांनी पाठीमागून डवचताच वडेट्टीवार यांनी सभात्याग करण्याचा निर्णय जाहीर केला, त्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT