
Mumbai, 04 July : विधानसभेत राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना आपल्या शैलीत टोमणे लगावले. पण, सत्ताधारी बाकावरील वरिष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनीही असा काही सिक्सर लगावला की, सभागृहात बोलणारे जयंतराव, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि तालिका अध्यक्षांसह सभागृहातील उपस्थित सर्व आमदार खळखळून हसले.
जयंत पाटील म्हणाले, आपल्यावर आता फार कर्ज आहे, सुमारे नऊ लाख ३२ हजार कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जापर्यंत सुधीरभाऊ (Sudhir Mungantiwar) आपण पोचलो आहोत. आता निर्धारच केला असेल की, पंधरा लाख कोटी रुपयांपर्यंत पोचविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, त्याला आमचा काय विरोध नाही. सुमारे नऊ लाख ३२ हजार कोटी हे फार कर्ज झाले आहे.
‘अजून तुम्हाला चार वर्षे काढायची आहेत. चार वर्षे काढताना तुम्हा आताच एवढं कर्ज वाढवून ठेवलं आहे की तुमच्या टर्मच्या शेवटी कर्ज फेडताना व्याज आणि मुद्दलाचे एवढे हप्ते येतील ना. त्या वेळी तुम्ही काहीच करू शकणार नाही. या आमदारांना पैसे कुठून देणार तुम्ही. आताच सुमारे 80 ते 90 हजार कोटी रुपयांची देणी द्यायची बाकी आहेत. एक लाख कोटी रुपयांची विजेची बिल थकलेले आहेत. तुम्हाला ही देणी द्यायची आहेत, ती देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत’, असे राज्याच्या आर्थिक स्थितीवर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी चिंता व्यक्त केली.
जयंत पाटील बोलत असतानाच सत्ताधारी बाकावरून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी असा काही सिक्सर मारला की, जयंत पाटलांसह, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह संपूर्ण सभागृहातील सर्व सदस्य खळखळून हसले. ते म्हणाले, ‘आम्ही एवढं कर्ज करू की, तुम्हाला सरकारमध्ये कधी मंत्री म्हणून यावसं वाटणारच नाही,’ असे उत्तर दिले. त्यावर सभागृहातील उपस्थित सदस्य पोट धरून हसले.
जयंत पाटील पुढे म्हणाले, आपला हा जो आग्रह आहे, त्याचे मी स्वागत करतो. बघू ‘देखना है जोर कितना बाजू-ए-कातिल में है’ म्हणत तुम्ही किती कर्ज काढताय, हे आपण बघू. हे आव्हानात्मकच दिसतं आहे. ठीक आहे, आमचं काही म्हणणं नाही. माझी विनंती आहे की, आपण निर्णय करा, निर्णय करताना राज्याचा आर्थिक समतोल बिघडवू देऊ नका.
ते म्हणाले, राज्यात गोरगरिबांवर नेहमी अन्याय होतो. जेव्हा संकट येतं, तेव्हा झोपडीत ..... आता बेघरांना घरं बांधण्याचं चाललं आहे. पण त्याचा पुढचा हप्ता देताना प्रॉब्लेम येतील. पंधरा हजार रुपयांचा हप्ता घेतल्यावर सहा महिने लोकांनी घरं ओपन केली. घराचा पाया आहे, पण पुढचे पैसेच आले नाहीत. घोषणा मोठ्या आहेत, त्याचे स्वागत आहे. मात्र, पुढचे पैसेच येत नाहीत, ती माणसं शेजारी जाऊन कुठल्या तरी झोपडीत राहतात आणि आपलं मूळ चांगलं, बऱ्यापैकी असलेली जागा त्या घरासाठी बांधतात. पुढचे हप्तेच येत नाहीत.
सरकारने पटलावर ठेवावं की राज्यात किती बांधकामं करायचं सांगितली आहेत, किती लोकांनी अर्धवट बांधकामे सोडली आहेत. हा आकडा काही हजारांचा किंवा लाखांचा असेल, त्यामुळे आमची विनंती आहे की, त्यात सुधारणा करावी, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.